कूपर रुग्‍णालयामध्‍ये पिवळ्या तापाचे लसीकरण केंद्र, सोमवार आणि गुरूवारी लसीकरण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 October 2023

कूपर रुग्‍णालयामध्‍ये पिवळ्या तापाचे लसीकरण केंद्र, सोमवार आणि गुरूवारी लसीकरण


मुंबई- आफ्रिकन देशात जाणाऱ्या भारतीयांना पिवळ्या तापाची (Yellow Fever) लागण होऊ नये म्हणून केंद्र सरकारच्या नियमानुसार पिवळ्या तापाची प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक असते. महाराष्ट्रातूनही प्रतिवर्षी आफ्रिकन देशांमध्ये जाणाऱ्यांची मोठी संख्या लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (bmc) जुहू विलेपार्ले स्थित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रूस्तम नरसी कूपर रुग्‍णालयामध्‍ये पिवळ्या तापाचे (पिवळा ज्वर) लसीकरण केंद्र (vaccination centre) सोमवार दिनांक ३० ऑक्‍टोबर २०२३ पासून सुरू करण्यात येत आहे. (vaccination center)

मुंबई विमानतळाचे आरोग्य अधिकारी डॉ. अच्छेलाल पासी यांच्या प्रमुख उपस्थितीत या लसीकरण केंद्राचे लोकार्पण सोमवार दिनांक ३० ऑक्‍टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेमध्ये दर्जेदार आणि अत्याधुनिक उपचार पद्धती समाविष्ट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या सुचनेनुसार, त्याचप्रमाणे उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रूस्तम नरसी कूपर रुग्‍णालयामध्‍ये पिवळ्या तापाचे लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. केंद्र शासनाने देखील या लसीकरण केंद्रासाठी लागणाऱया आवश्यक त्या सर्व परवानग्या दिल्या आहेत. कूपर रुग्णालयाच्या औषधशास्त्र विभाग अंतर्गत सदर लसीकरण केंद्र कार्यान्वित असेल. आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी व गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत या केंद्रात लाभार्थींना लस उपलब्ध असेल. त्यासाठी प्रति लाभार्थी ३०० रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे. लसीकरणासाठी येताना लाभार्थ्याला त्याचे पारपत्र (पासपोर्ट) सोबत असणे गरजेचे राहील, अशी माहिती कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक रूग्णालय (केईएम हॉस्पिटल) आणि सेठ गो. सुं. वैद्यकीय महाविद्यालयात यापूर्वीच पिवळ्या तापाचे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रूस्तम नरसी कूपर रुग्‍णालयामध्‍ये देखील पिवळ्या तापाचे लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील रहिवाशांना विशेष फायदा होईल, असेही डॉ. मोहिते यांनी नमूद केले.

कूपर रुग्णालयातील औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र केंभवी म्हणाले की, आफ्रिकन देशांमध्ये पिवळा ताप हा गंभीर आजार मोठय़ा प्रमाणावर आढळतो. या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या इतरही नागरिकांना पिवळ्या तापाची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आफ्रिकन देशात जाणाऱ्या प्रत्येक विदेशी पर्यटकाला या आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पिवळ्या तापाची प्रतिबंधात्मक लस देणे अत्यावश्यक आहे. या लसीमुळे संबंधित पर्यटक आफ्रिकन देशातून आपल्या देशात परतल्यानंतर त्यांच्या मूळ देशात आजार पसरत नाही. जागतिक आरोग्य संस्थेच्या निकषानुसार व पिवळ्या तापाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक प्रवाशाला आफ्रिकन देशात जाण्यापूर्वी पिवळ्या तापाची प्रतिबंधात्मक लस द्यावी लागते. ही लस घेतल्याचे अधिकृत प्रमाणपत्र संबंधित प्रवाशाने जोडल्याशिवाय या प्रवाशाला त्या देशात जाण्याचा व्हिजाही मिळत नाही. सबब, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रवाशांना लसीकरणासाठी अडचण येऊ नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक रूग्णालय आणि सेठ गो. सुं. वैद्यकीय महाविद्यालयात यापूर्वीच पिवळ्या तापाचे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. आता कूपर रुग्णालयातही ही सुविधा मिळणार असल्याने आफ्रिकन देशांमध्ये जाणाऱया प्रवाशांना नक्कीच फायदा होईल, असे त्यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad