मुंबई - दादर येथील चैत्यभूमीवर ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. देशभरातून अनुयायी १ डिसेंबरपासूनच चैत्यभूमीकडे येतात. त्यामुळे चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे अनुयायांसाठी उत्तम व्यवस्था करावी. त्यासाठी सूक्ष्म नियोजन करून अंमलबजावणी करावी, अशा सूचना मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी दिल्या.
मुख्य सचिव कार्यालयाच्या समिती कक्षात महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत मुख्य सचिव सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेताना मुख्य सचिव सौनिक बोलत होते. बैठकीस मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगर पालिकेचे उपायुक्त बिरादार, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
महापरिनिर्वाण दिनाला येणाऱ्या अनुयायांकरिता पिण्याचे पाणी, शौचालय आदींची सुविधा सज्ज करण्याचे निर्देश देत मुख्य सचिव सौनिक म्हणाले की, मागील वर्षापेक्षा जास्त सुविधा देण्यात याव्यात. शौचालये ही पारंपरिक पद्धतीची न वापरता केमिकल पद्धतीची उपयोगात आणावी. गर्दीची ठिकाणे चिन्हांकित करून तेथे आधुनिक धूळ नियंत्रण यंत्रांचा उपयोग करून धूळ नियंत्रित करावी. चैत्यभूमी येथील संरक्षक भिंतीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण करावे. चैत्यभूमी परिसरात वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात यावा. प्रत्येक विभागाने आपल्याला दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, याची दक्षता घ्यावी.
बैठकीत महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्यावतीने विविध मागण्या मांडल्या. याप्रसंगी उपायुक्त बिरादार यांनी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते
No comments:
Post a Comment