अवकाळी पावसाने ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित, पंचनामे प्रस्ताव सादर करा - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 November 2023

अवकाळी पावसाने ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित, पंचनामे प्रस्ताव सादर करा - मुख्यमंत्री


मुंबई - गेल्या दोन दिवसात राज्यातील काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्याची मागणी शासनाकडे प्राप्त झाली आहे. राज्यातील अवकाळी पाऊस पडलेल्या तालुक्यातील आजपर्यंत प्राप्त प्राथमिक अंदाजे माहितीनुसार ९९ हजार ३८१ हेक्टर बाधित क्षेत्रातील पंचनामे  प्रचलित कार्यपद्धती प्रमाणे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत व 33 टक्के पेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या प्रकरणी निधी मागणीचा प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे पाठविण्याची व्यवस्था करावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. (Unseasonal rain affected 99 thousand 381 hectares area)
            
दिनांक २६ नोव्हेंबर रोजी अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळपिकांच्या बाधित क्षेत्राबाबत आज दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ रोजी कृषी विभागाकडून प्राप्त प्राथमिक अंदाजे माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड हे तालुके बाधित असून यातील ५३ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई व डहाणू तालुक्यातील ४१ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण, नांदगाव, नाशिक, निफाड, त्र्यंबकेश्वर, सटाणा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर,चांदवड, येवला तालुक्यातील ३२ हजार ८३३ हेक्टर क्षेत्रातील कांदा, द्राक्ष, सोयाबीन, मका, गहू, ऊस व फळपिके, धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपुर, शिंदखेडा तालुक्यातील ४६ हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई, कापूस, हरभरा, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्राणी तालुक्यातील २ हजार २३९ हेक्टर क्षेत्रातील भात, कापूस, तूर, मिरची, मका, कांदा पिकांचे, जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, धरणगाव, बोदवड, भडगांव तालुक्यातील ५५२ हेक्टर क्षेत्रातील कांदा, हरभरा, गहू, मका, ज्वारी व फळपिकांचे नुकसान झाले.  
                
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, कोपरगाव, पारनेर, राहता येथील १५ हजार ३०७ हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई, मक्याचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, शिरुर तालुक्यातील ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष,कांदा पिकांचे नुकसान झाले आहे, सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील १५ हेक्टर क्षेत्रातील भात पिकाचे नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर, पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव आणि फुलंब्री तालुक्यातील ४ हजार २०० हेक्टर क्षेत्रातील  केळी, पपई व मका पिकांचे नुकसान झाले आहे.
         
जालना जिल्ह्यातील बदनापूर, जालना, जाफ्राबाद तालुक्यातील ५ हजार २७९ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, केळी, कांदा, खरीप ज्वारी, गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील परळी, बीड तालुक्यातील २१५ हेक्टर क्षेत्रातील कांदा, ज्वारी, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील १०० हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, जिंतूर, पाथरी, पूर्णा, पालम मानवत सोनपेठ, सेलू तालुक्यातील १ हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बी ज्वारी, कापूस, सीताफळ, पेरू, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील नांदेड, मुदखेड तालुक्यातील ५० हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील बुलडाणा, नांदुरा, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, संग्रामपूर, मेहकर, जळगाव जामोद, मलकापूर, खामगाव, शेगाव, मोताळा, नांदूरा तालुक्यातील ३३ हजार ९५१ हेक्टर क्षेत्रातील भाजीपालाचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेले क्षेत्र हे प्राथमिक अंदाजानुसार आहे. नुकसान झालेल्या क्षेत्रांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी वेळेत सादर करावेत अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad