नागपूर/मुंबई - देशात सध्या लोकशाही व संविधान धोक्यात आहे, महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. केंद्रातील ३२ लाख सरकारी पदे रिक्त असतानाही मोदी सरकार नोकर भरती करत नाही, मागासवर्गीयांना संधी मिळेल म्हणून मोदी सरकार नोकर भरती करत नाहीत. मोदींना जगभर फिरण्यास वेळ आहे पण संसदेचे अधिवेशन सुरु असताना संसदेत येण्यास वेळ नाही. संसदेत प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांना निलंबित करून कायदे पास करून घेतले ही लोकशाहीची थट्टा आहे. लोकशाहीला न जुमनणाऱ्या मोदी व भाजपाला धडा शिकवा असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केले.
काँग्रेसच्या १३९ व्या स्थापना दिनी नागपूरच्या ‘भारत जोडो’ मैदानात अतिविराट जाहीर सभेला ते संबोधित करत होते. ते पुढे म्हणाले की, संविधानाने महिला, गरिब, मागास समाजाला अधिकार दिले ते भाजपा देऊ शकत नाही. काँग्रेस पक्ष फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचारधारेवर चालतो तर मोदी आरएसएसच्या विचारधारेवर चालतात. मोदी सरकारने देशावर २०० लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर करुन ठेवला आहे पण कल्याणकारी योजनांवरील निधीमध्ये कपात केली जाते, मागास समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली नाही. मोदी सरकारच्या काळात दलितांवर अत्याचार वाढले आहेत. भाजपाला रोखले नाही तर देश बरबाद होईल, संविधान संपुष्टात येईल.
माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यावेळी म्हणाले की, केंद्रात सत्ता आल्यापासून नरेंद्र मोदी यांनी सर्व सरकारी यंत्रणांवर कब्जा केला आहे यातून मीडिया, निवडणूक आयोग, न्यायालयेही सुटली नाहीत. दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते पण १० वर्षात मोदींनी किती लोकांना रोजगार दिला? देशात आज ४० वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी आहे. नोकरी नसल्याने कोट्यवधी तरुणांची शक्ती वाया जात आहे. शेतकरी, तरुण संकटात आहे तर दुसरीकडे देशातील दोन-चार उद्योगपतींकडे देशातील सर्व संपत्ती सोपवली जात आहे. ओबीसी, दलित, मागासवर्गीयांना सत्तेत, प्रशासनात अत्यंत कमी वाटा मिळत आहे. सर्वच क्षेत्रात या समाज घटकांना कमी स्थान दिले जाते. काँग्रेस पक्षाने जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली त्यानंतर मोदींची भाषा बदलली व देशात गरिब ही एकच जात आहे असे ते बोलत आहेत. देशातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जावे लागणार आहे, हीच काँग्रेसची विचारधारा आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना करेल व देशातील तरुणांना रोजगाराची आवश्यकता आहे ते मोदी सरकार दे देऊ शकत नाही ते काम काँग्रेस पक्षच करेल. आपल्या मदतीने महाराष्ट्रात व देशात परिवर्तन आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहु महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा असलेल्या भूमीत काँग्रेस स्थापना दिन साजरा होत आहे याचे स्वागत आहे. महात्मा गांधी यांनी याच नागपुरातून हुकूमशाही सत्तेच्या विरोधात नारा दिला व संपूर्ण देशातून जनता एकवटली आणि १५० वर्षांची ब्रिटिशांची हुकूमशाही राजवट संपुष्टात आणली. नागपुरातून याच भूमितून इंदिराजी गांधी यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा ठराव केला होता. भारताच्या मध्यवर्ती भागात ही सभा होत असून मल्लिकार्जून खरगे व राहुलजी गांधी यांचा संदेश देशात जावा यासाठी ही सभा महत्वाची आहे. हुकूमशाही सत्तेला बाहेर हाकलण्यासाठी, कामगार, शेतकरी, तरुणांना न्याय देण्यासाठी, लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी है तैयार हम, हा संदेश या सभेतून दिला आहे. इंदिराजी गांधी यांनी देशात हरित क्रांती, श्वेत क्रांती आणली, देशाचा विकास केला. इंदिराजी गांधी यांनी त्यावेळी नागपुरात सभा घेतली व विदर्भातील जनतेने लोकसभेच्या ११ पैकी ११ जागा विजय मिळून दिला व इंदिराजी पंतप्रधान झाल्या. आज इंदिराजी यांचे नातू राहुलजी गांधी मोहब्बत का संदेश घेऊन आले आहेत, त्यांनाही विदर्भ व महाराष्ट्राने तशीच साथ द्यावी, असे आवाहन पटोले यांनी केले.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले की, स्वातंत्र्यापासून आजपर्यंत काँग्रेस पक्षाने बलिदान दिले आहे, हे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका. चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित निकाल लागला नाही तरी जनतेचा पाठिंबा मात्र वाढला आहे. देशासमोर आज मोठी संकटे उभी आहेत, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिला अत्याचार या विषयावर भाजपा सरकार बोलत नाहीत. जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून धर्मांध शक्ती वेगळे मुद्दे पुढे करत आहे. काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न आजपर्यंत अनेकांनी केला, काँग्रेस संपली नाही पण ते लोक मात्र संपले हे लक्षात ठेवा. राज्यात समाजा-समाजात वाद उभे केले आहेत, लोकांमध्ये भांडणे लावून सत्तेची पोळी भाजली जात आहे. जातनिहाय जनगणना करणे व आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणे ही काँग्रेसची भूमिका आहे पण भाजपा सरकार ते करत नाही. देशाची लोकशाही व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. देशाला व राज्याला मजबूत व स्थिर सरकार देण्यासाठी इंडिया आघाडीला विजयी करा.
काँग्रेसच्या १३९ व्या स्थापना दिनी नागपूरच्या ‘भारत जोडो’ मैदानात अतिविराट जाहीर सभा झाली. या सभेला राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जून खरगे, माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू, प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री CWC सदस्य अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, गोवा, दिव व दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, वर्षा गायकवाड, डॉ. विश्वजित कदम, माजी खासदार मिलिंद देवरा, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, बसवराज पाटील, आ. कुणाल पाटील, आ. प्रणिती शिंदे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्या संध्या सव्वालाखे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आ. वजाहत मिर्जा, नागपूर शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, आमदार अभिजित वंजारी, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार, देशातील काँग्रेसचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते, वरिष्ठ नेते, पदाधिकारी व लाखो लोक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन खासदार मुकुल वासनिक यांनी केले तर आभार प्रदर्शन विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
No comments:
Post a Comment