BMC Budget 2024 - 25 / पालिकेचा 59 हजार 954 कोटींचा अर्थसंकल्प सादर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 February 2024

BMC Budget 2024 - 25 / पालिकेचा 59 हजार 954 कोटींचा अर्थसंकल्प सादर


मुंबई (अजेयकुमार जाधव) - देशातील सर्वात मोठी महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेची ओळख आहे. 2024 - 25 या आर्थिक वर्षासाठी 59,954.75 कोटींचा अर्थसंकल्प आज (2 फेब्रुवारीला) सादर करण्यात आला. 2023 - 24 मध्ये 54256.07 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. मागील वर्षापेक्षा 10.50 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंग चहल यांनी दिली. 
 
2024 - 25 या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या 59,954.75 कोटींच्या अर्थसंकल्पात रस्ते वाहतूक सागरी किनारा प्रकल्प पूल यासाठी 12110.97 कोटी, आरोग्यासाठी 7191.13 कोटी, घनकचरा व्यवस्थापनसाठी 5376.36, पर्जन्य जल वाहिन्यासाठी 2674 कोटी तर प्राथमिक शिक्षणासाठी 3497.82 कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. 

महसूली उत्पन्न - 
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये २८६९३.३० कोटी इतके प्रत्यक्ष महसूली उत्पन्न प्राप्त झाले होते. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे महसूली उत्पन्नाचे अर्थसंकल्पीय अंदाज ३३२९०.०३ कोटी एवढे प्रस्ताविण्यात आले होते, ते ३२८९७.६८ कोटी असे सुधारण्यात आले असून अंदाजामध्ये ३९२.३५ कोटी इतकी घट झाली आहे. दिनांक ३१.१२.२०२३ पर्यंत १९२३१.५५ कोटी इतके प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झाले आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता अंदाजित महसूली उत्पन्न ३५७४९.०३ कोटी इतके प्रस्ताविले असून ते सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेत २४५९ कोटीने जास्त आहे.

मालमत्ता करात घट - 
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये सन २०१९-२० प्रमाणेच मालमत्ता कराची वसूली करण्यात आली असून मालमत्ता करापोटी ४९९४.१५ कोटी इतके प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झाले आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये, मालमत्ता करापोटी ६००० कोटी इतके उत्पन्न अंदाजिले होते, ते ४५०० कोटी असे सुधारीत करण्यात आले असून त्यामध्ये १५०० कोटी इतकी घट झाली आहे.

बेस्टला 928 कोटी -
बेस्ट उपक्रम आर्थिक अडचणीत असल्याने पालिकेकडून दरवर्षी आर्थिक मदत केली जात आहे. 2024 - 25 या आर्थिक वर्षात पालिका बेस्टला 800 कोटी रुपये देणार आहे. तसेच अतिरिक्त 128.65 कोटी रुपये देणार आहे. 2024 - 25 या आर्थिक वर्षात पालिका बेस्टला एकूण 928.65 कोटींची आर्थिक मदत करणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad