मुंबई - फोर्ट येथील सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स आणि इकोनॉमिक्समध्ये आज माजी प्राध्यापक आणि कर्मचारी यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर उपस्थित होते. यावेळी दरेकर यांनी कॉलेजमधील जुन्या आठवणींना उजाळा देत सिद्धार्थ कॉलेजमध्ये जे वैचारिक वारसा, संस्कार मिळू शकतात ते दुसऱ्या इतर कुठल्याही कॉलेजमध्ये मिळू शकत नाहीत, असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. यू. एम. म्हस्के, संजय घाडी, माजी नगरसेवक विठ्ठल लोकरे, यांसह महाविद्यालयातील प्राचार्य, माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, सिद्धार्थ महाविद्यालयाचे अनन्य साधारण असे आमच्यावर उपकार आहेत. ज्या ठिकाणी मी राजकारणाचे काम करतो, विधिमंडळाचे सभागृह असो किंवा महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता म्हणून फिरत असताना या-ना त्या कारणाने मी सिद्धार्थ कॉलेजची आठवण केली नाही असा एकही प्रसंग, दिवस नाही. मला ७८ टक्के मार्क होते. अनेक लोकं बोलली की सिद्धार्थ कॉलेजलाच का ऍडमिशन घेतले? बाकीच्या कॉलेजला तुम्हाला काही मिळू शकते परंतु सिद्धार्थ कॉलेजला जो वैचारिक वारसा, संस्कार मिळू शकतात ते दुसऱ्या कुठल्याही कॉलेजमध्ये मिळू शकत नाहीत, असेही दरेकर म्हणाले.
दरेकर पुढे म्हणाले की, ज्या-ज्यावेळी सिद्धार्थ कॉलेजचे प्रश्न आले ते त्या-त्या स्तरावर मांडायचो. विरोधी पक्षनेता असताना सिद्धार्थ कॉलेजच्या लिकेजबाबत बातमी वाचली. दुसऱ्या दिवशी कॉलेजला भेट दिली आणि मविआ सरकारला इशारा दिला. तेव्हाचे समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांना बैठक लावायला सांगितली. त्यांनी १२ कोटी रुपये सिद्धार्थ कॉलेजच्या डागडुजी आणि सुधारणेकरिता दिले, अशी आठवणही दरेकरांनी सांगितली. तसेच सिद्धार्थ कॉलेजमध्ये आलेल्या माणसाला जीवनात वाटचाल करण्यासाठी जी हिंमत, धाडस आणि संस्कार जे मिळतात ते दुसऱ्या कुठल्याही कॉलेजला मिळू शकत नसल्याचेही दरेकरांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, जेव्हा जेव्हा आंबेडकर चळवळीचा विषय येतो तेव्हा मी सगळ्यांना सांगतो माझ्यावर आंबेडकर चळवळीचा प्रभाव हा सिद्धार्थ कॉलेजमुळेच झाला आहे. आंबेडकर चळवळीचा ठेवा या कॉलेजमधून घेऊन गेल्यामुळे राजकारणात मला त्याचा उपयोग झाल्याचे दरेकरांनी आवर्जून सांगितले. तसेच विधिमंडळात परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विषय यायचा त्यावेळी मी त्यांचे स्मारक, जन्मस्थळ असो त्यात माझा हिरहिरीने भाग असायचा. दुराव्यस्थ असलेल्या महाड येथील चवदार तळ्याबाबत सभागृहात लक्षवेधी मांडली होती. त्यानंतर चवदार तळ्यासाठी अडीच कोटी याच विद्यार्थ्याने मिळवून दिल्याचेही दरेकरांनी म्हटले.
तसेच कॉलेज जीवनात आम्ही येईल त्या संकटाना धैर्याने लढलो. विधिमंडळाच्या सभागृहातही सरकारवर आघात करताना कसल्याही प्रकारची तमा न बाळगता सरकारवर तुटून पडण्याचे काम केले आहे. धाडस, हिंमत ही सिद्धार्थ कॉलेजमधून आम्हाला मिळाली. चांगले पारिवारिक संस्कार जपण्याचा विचारही या कॉलेजने आम्हाला दिल्याचे दरेकर म्हणाले. त्याचबरोबर माजी विद्यार्थी यांचा संघ स्थापन करून दरवर्षी असे कार्यक्रम घ्या, अशी विनंतीही दरेकरांनी यावेळी केली.
सिद्धार्थ कॉलेजमुळे मैत्रीत एकोपा -
सिद्धार्थ कॉलेजचे आमच्या जीवनात फार मोठे उपकार आहेत. आम्ही कॉलेजला असताना कुठल्या पक्षाचे, जाती-धर्माचे आहोत याचा कधीच विचार शिवला नाही. आम्ही सर्व मित्र वेगवेगळ्या पक्षात काम करतो. मात्र सुदैवाने आमच्या मैत्रीत सिद्धार्थ कॉलेजने जो एकोपा आणला आहे त्यामुळे तडा जाऊ शकला नाही.
No comments:
Post a Comment