Mumbai News - मुंबईत मागील २ वर्षात क्षयरुग्णांच्या संख्येत घट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 March 2024

Mumbai News - मुंबईत मागील २ वर्षात क्षयरुग्णांच्या संख्येत घट


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षयरोग नियंत्रण विभागाद्वारे रुग्णांना निदान आणि उपचारामध्ये पुरवण्यात येणाऱ्या सेवा, रुग्णांचा नियमित पाठपुराव्यामुळे आणि अत्याधुनिक निदान चाचणी सुविधा यासारख्या सुविधांमुळे क्षयरुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. औषध प्रतिरोध क्षयरोगाचा २०२० वर्षासाठी क्षयरोग बरा होण्याचा दर ७२ % इतका असून वर्ष २०२१ मध्ये हा दर  ७७ % पर्यंत वाढला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत क्षयरोग नियंत्रणासाठी सातत्याने हाती घेण्यात आलेल्या विशेष उपक्रमामुळे रूग्णसंख्येत घट शक्य झाली आहे. वर्ष २०२२ आणि २०२३ दरम्यान नव्याने आढळलेल्या तसेच एकूण क्षय रूग्णांच्या संख्येतही घट झाल्याची आकडेवारी आहे. मुंबईतील रूग्णसंख्येत एकीकडे घट झालेली असतानाच दुसरीकडे मुंबई बाहेरून उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांच्या संख्येत मात्र वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. (Decrease in number of TB patients in last 2 years in Mumbai)

सद्यस्थितीत मुंबईत ४२ सीबीनॅट (CBnaat) मशीन, 10 (ट्रूनॅट) Truenat मशीन्स, ३ कल्चर आणि डीएसटी लॅब याद्वारे अत्याधुनिक चाचणी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच २५ सार्वजनिक क्षेत्रातील आणि ६ खाजगी केंद्रांवर औषध प्रतिरोधी उपचारांची सुविधा ही रूग्णांसाठी मोफत उपलब्ध आहे. तसेच कार्यक्रमामध्ये सहभागी असलेल्या निवडक खाजगी डॉक्टर आणि खाजगी रुग्णालयांमध्ये सुद्धा क्षयरुग्णांचे निदान व उपचार मोफत उपलब्ध आहेत. 

मुंबईत क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला सर्व विभागामध्ये मोहीम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले होते. त्यानुसारच क्षयरोग निर्मूलनासाठी आगामी दिवसात जनजागृतीपर संपूर्ण २४ विभागात कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. अतिजोखीम गटातील रूग्णांचे बीसीजी लसीकरण आणि रूग्ण शोधण्यासाठी अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली आहे. 

मुंबईत क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्रभावी जनजागृती मोहीम राबवली जात आहे. अतिजोखीम गटातील रूग्णांचे बीसीजी लसीकरण, रूग्णांचा आहार आणि रूग्ण शोधण्यासाठी अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यानुसारच क्षयरोग निर्मूलनासाठी आगामी दिवसात जनजागृतीपर सर्व विभागात कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.  

मुंबईतील रूग्णांच्या संख्येत घट -
वर्ष २०२३ मध्ये एकूण १ लाख ८२ हजार ८ इतके नमुन्यांची चाचणी  करण्यात आली आहे.  एकूण क्षयरुग्णांपैकी पुरुष क्षयरुग्ण आणि स्त्री क्षयरुग्ण यांचे प्रमाण जवळपास समान आहे. मुंबईतील रूग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दोन वर्षांच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. मुंबईत वर्ष २०२२ मध्ये ५५ हजार २८४ रूग्ण आढळले होते. तर वर्ष २०२३ मध्ये या रूग्णांची संख्या ५० हजार २०६ इतकी आढळली आहे. 
 
बीसीजी लसीकरण कार्यक्रम-
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन प्रकल्प (NTEP) यांचा मुंबईच्या अति जोखमीच्या गटातील लोकसंख्येसाठी प्रौढ बीसीजी लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या राष्ट्रीय कार्यक्रम अंतर्गत मुंबईच्या सर्व २४  विभागात चाचण्या राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये १२ विभाग मध्यस्थ (इंटरव्हेंशनल) असतील आणि १२ विभाग हे नियंत्रणाचे विभाग असतील. मध्यस्थ विभागामधील १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील ६ अतिजोखीम गटातील लाभार्थ्यांची निवड केली जाईल.

एकूण ६ अति जोखीम गटामध्ये (१) गत ५ वर्षातील क्षयरोगाने बाधित रुग्ण, (२) मागील ३ वर्षातील क्षयरोग रूग्णांचे घरगुती संपर्कातील व्यक्ती, (३) स्वयंघोषित मधुमेही, (४) स्वयंघोषित धूम्रपान करणारे, (५) कुपोषित, (६) वय ६० वर्षांपेक्षा जास्त अशा रूग्णांचे लसीकरण करण्यात येईल.  हे ऐच्छिक लसीकरण आहे, म्हणून पात्र लाभार्थ्यांकडून लेखी संमती घेतली जाईल. त्याची अंमलबजावणी टप्प्य-टप्प्याने केली जाईल. एप्रिल २०२४ मध्ये आरोग्य स्वयंसेविका आणि आशा सेविकांद्वारे पात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण केले जाईल. मे २०२४ मध्ये लसीकरण केले जाईल. उर्वरित नागरिकांच्या लसीकरणासाठी जून, जुलै आणि ऑगस्ट २०२४ मध्ये फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. 

कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित क्ष- किरण सेवा -
कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial intelligence AI) आधारित क्ष-किरण (एक्स-रे) सेवेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. संशयित क्षयरुग्ण तत्काळ (३ मिनिटांच्या आत) ओळखण्यासाठी गत दोन वर्षात STOP TB आणि Qure.ai च्या भागीदारीत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानाद्वारे एकूण ९० हजार ७५१ क्ष-किरण (एक्स रे) काढण्यात आले असून ९२१ एवढे क्ष-किरणांमध्ये संभाव्य क्षयरुग्ण आढळले आहेत. तसेच या सर्व क्षयरुग्णांचा वैद्यकीय पाठपुरावा करण्यात येत आहे.   

थुंकी नमुना (स्पुटम सॅपल) मागोवा घेण्यासाठी प्रणाली -
थुंकी नमुना घेऊन वैद्यकीय चाचणी करताना मागोवा घेण्यासाठी क्युआर (QR) कोड आधारित प्रणालीची पथदर्शी यशस्वी चाचणी केल्यानंतर मुंबईतील सर्व विभागांमध्येही प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. चाचणी करण्यासाठी लागणारे नमुने आणि चाचणी करण्यासाठी लागलेला प्रत्यक्ष वेळ यावर देखरेख ठेवण्यासाठी मदत होईल. 

अतिरिक्त ट्रूनॅट (Truenat) संयंत्र-
एकूण २४ Truenat संयंत्र आता कार्यान्वित करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे बहुऔषधी प्रतिरोध (एमडीआर) असलेल्या क्षयरोगाचे निदान त्वरित करण्यास मदत होईल. 

पोषक आहाराचा फायदा -
नि-क्षय मित्रांद्वारे सर्व क्षयरुग्णांना दर महिन्याला असे सहा महिन्यांकरीता पोषक आहार दिला जात आहे. त्यामुळे क्षयरुग्णांना पोषक आहार मिळून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती सुधारुन ते क्षयमुक्त होण्यास मदत होणे अपेक्षित आहे. मुंबई जिल्ह्यात सन २०२२-२०२४  मध्ये ८८ हजार ८९ इतक्या पोषण आहार कीटचे वाटप झाले आहे. त्याचा १९ हजार ८१८ क्षयरुग्णांना लाभ झाला आहे.  

जागतिक क्षयरोग दिन २०२४ क्षयरोग विषयक जनजागृतीकरिता मुंबई जिल्ह्यात राबवण्यात येणारे उपक्रम -
संपूर्ण मुंबईतील १२० फलकांद्वारे आणि १२० बेस्ट बस थांब्यांवर क्षयरोग जनजागृती माहिती संदेश प्रदर्शित केला जाईल.
क्षयरोग विषयक ध्वनी संदेश जिंगल स्वरुपात मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या डब्यांमध्ये प्रसारित केली जाईल. 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारत आणि बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीस जागतिक क्षयरोग दिनानिमित्त विद्युत रोशणाई करण्यात येईल. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त वांद्रे - वरळी सागरी सेतूवर विद्युत रोशणाई करण्यात येईल. 

क्षयरोगाची प्रमुख लक्षणे-
दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा खोकला
दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा ताप
वजन कमी होणे / भूक मंदावणे
रात्री घाम येणे
मानेवर गाठ येणे

अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी दुर्लक्ष करू नये आणि जवळच्या बृहन्मुंबई महानगरपालिका दवाखाना, आरोग्य केंद्र, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे भेट द्यावी. क्षयरुग्णांना सर्व सेवा आणि उपचार मोफत उपलब्ध आहेत, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad