पावसाळा तोंडावर आला असताना पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी, जलविभाग, मलनि:सारण विभाग, रस्ते विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग अशा १६ विभागातील ५० हजार कर्मचारीवर्ग निवडणूक कामाला जाणार असून १२ हजार कर्मचारी आधीच निवडणूक ड्युटीत व्यस्त झाले आहेत. त्यामुळे पावसाळी कामकाजावर परिणाम होण्याची भीती पालिका प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. त्यात आता पालिकेच्या केईएम, नायर यांसह प्रमुख रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांसह ८०० हून अधिक स्टाफ निवडणुकीच्या कामात व्यस्त होणार आहे. पालिकेच्या या प्रमुख रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण तपासणीसाठी येतात आणि काहींना उपचारासाठी दाखल केले जाते. मात्र पालिका रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका तसेच औषधेही वेळेवर मिळत नाहीत, असा आरोप रुग्णांच्या नातेवाइकांकडून करण्यात येतो. त्यात आता डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीला गेल्यामुळे रुग्णसेवा कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केईएम रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका, कार्यालयीन स्टाफ असा सुमारे पाच हजार कर्मचारीवर्ग कार्यरत आहे. त्यापैकी दोन हजार स्टाफला इलेक्शन ड्युटीला लावण्यात आले आहे.
शस्त्रक्रियांवर परिणाम -
पालिकेच्या प्रमुख रुग्णालयात दररोज शेकडो शस्त्रक्रिया होतात. मात्र डॉक्टर, परिचारिका निवडणुकीच्या ड्युटीला गेल्याने शस्त्रक्रियेवर परिणाम होण्याची भीती रुग्णालयातील वरिष्ठांनी व्यक्त केली. एकूणच पालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना पुढील दोन ते तीन महिने प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.
No comments:
Post a Comment