भाजपला सत्ता दिल्यास देश कर्जात बुडेल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 March 2024

भाजपला सत्ता दिल्यास देश कर्जात बुडेल


नवी मुंबई - २०१४ सालापूर्वी देशातील प्रत्येक नागरिकावर १०० पैकी २४ रुपये कर्ज होते. मात्र, मागील दहा वर्षांत हेच कर्ज ८४ रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच १० वर्षांत प्रत्येक नागरिकावर तब्बल ६० रुपयांचे कर्ज वाढले असून, २०२६ साली देश कर्जात बुडालेला असेल, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. तुम्हाला कर्जात बुडायचे नसेल तर भाजपच्या विरोधात मतदान करा, असे आवाहन त्यांनी नेरूळमध्ये बुधवारी झालेल्या सत्ता परिवर्तन महासभेत उपस्थितांना केले.

‘इस बार ४०० पार’ असा प्रचार भाजपकडून केला जात आहे; परंतु या जागा निवडून आणायच्या की नाही, हे मतदारांच्या हातात असून, इस बार सेक्युलर विचारांचे सरकार येणार असल्याचे ते म्हणाले. भाजपने देशातील व्यवस्था बिघडवली असून, मागील १० वर्षांत सुमारे ३० ते ३५ हजार छापे टाकले आहेत; परंतु यामधील किती जणांना कोर्टाने शिक्षा सुनावली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

देशातील प्रत्येक राज्यात छापे पडत असताना गुजरातमध्ये एकही छापा पडलेला नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. राज्यातील अनेक उद्योग, कारखाने गुजरातला गेले असून, पुन्हा पाच वर्षे भाजपला दिल्यास सर्वच कारखाने गुजरातेत जातील, असे ते म्हणाले. मोदी हे देशापेक्षा गुजरातचेच पंतप्रधान अधिक असल्याची टीका यावेळी आंबेडकर यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad