Mumbai News - डॉ. अमित सैनी यांनी स्वीकारला अतिरिक्त महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अमित सैनी यांनी आज (दिनांक २० मार्च २०२४) सकाळी पदभार स्वीकारला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्याकडून डॉ. सैनी यांनी हा पदभार स्वीकारला. (Saini accepted the charge of Additional Municipal Commissioner)

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने सह आयुक्त (सामान्य प्रशासन) श्री. मिलिन सावंत यांनी डॉ. सैनी यांचे स्वागत केले. नवनियुक्त अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, उप आयुक्त (शिक्षण) चंदा जाधव, उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, प्रमुख कर्मचारी अधिकारी रिमा ढेकणे यांच्यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.

डॉ. सैनी यांनी एम. बी. बी. एस. (मेडिसीन) पदवी संपादीत केली आहे. ते भारतीय प्रशासन सेवेतील सन २००७ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. डॉ. सैनी यांनी प्रशासकीय सेवेची सुरुवात रत्नागिरीचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून केली. त्यानंतर बुलढाणा येथे सहायक जिल्हाधिकारी, गडचिरोली आणि नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. नागपूर येथे कार्यरत असताना विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य सचिव या पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील त्यांनी पाहिला. त्यानंतर जिल्हाधिकारी या नात्याने त्यांनी गोंदिया आणि कोल्हापूर या जिल्ह्यांची धुरा सांभाळली. तसेच, मुंबई येथे विक्री कर विभागात सह आयुक्त पदावर कामकाज पाहत असताना महाराष्ट्र राज्य लॉटरी मंडळाच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील त्यांनी हाताळला. नंतर महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. अलीकडे ते जल जीवन अभियानाचे संचालक म्हणून कार्यरत होते.

Post a Comment

0 Comments