पल्स अँटी-रेबिज लसीकरण मोहिमेत २६ हजार ९५१ श्वानांचे लसीकरण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 March 2024

पल्स अँटी-रेबिज लसीकरण मोहिमेत २६ हजार ९५१ श्वानांचे लसीकरण


मुंबई - श्वान चावल्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून बचावाच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या पल्स अँटी-रेबीज लसीकरण मोहिमेत २६ हजार ९५१ श्वानांचे लसीकरण करण्यात आले. दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ ते दिनांक १ मार्च २०२४ दरम्यान ही लसीकरण मोहीम राबविण्यात आली. वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस-मिशन रेबीज (डब्ल्यूव्हीएस-एमआर) या संस्थेचे मोहिमेला सहकार्य लाभले.

प्राणी कल्याण करणे व त्यासोबतच प्राण्यांपासून मानवामध्ये होणारे संक्रमण टाळण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर अँटी रेबीज लसीकरण मोहीम हा उपक्रम राबविला जात आहे.

यासंदर्भात पशुवैद्यकीय विभाग आणि देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलिमपाशा पठाण यांनी सांगितले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेने वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस-मिशन रेबीज यांच्यासोबत मिळून बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारक्षेत्रातील ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलच्या हद्दीला लागून असलेल्या १० प्रशासकीय विभागांतील भटक्या श्वानांचे लसीकरण करण्यासाठी दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ ते दिनांक १ मार्च २०२४ दरम्यान ही मोहीम हाती घेण्यात आली. या पाच दिवसांच्या कालावधीत २६ हजार ९५१ श्वानांचे लसीकरण करण्यात आले. श्वान पकडणारे प्रशिक्षित स्वयंसेवक, मुंबई पशूवैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य आदींनी अहोरात्र मेहनत घेत सूक्ष्म व्यवस्थापन आणि उत्तम अंमलबजावणीच्या बळावर ही मोहीम यशस्वी करून दाखविली आहे.

नुकताच चेंबूर येथे या मोहिमेचा समारोप कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास एम पूर्व विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे, वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ल्यूक गॅम्बल, पशुवैद्यकीय विभाग आणि देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलिमपाशा पठाण, मुंबई पशूवैद्यकीय महाविद्यालयातील व्हेटरनरी सर्जरी आणि रेडिओलॉजी विभागातील प्रा. डॉ. संतोषमनी त्रिपाठी, डॉग्स ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओवेन शार्प, डब्ल्यूव्हीएस आयटीसीचे (ऊटी) मुख्य कार्यकारी अधिकारी निगेल ऑट्टर, मिशन रेबीज इंडियाचे संचालक (क्रियान्वयन) डॉ. बालाजी चंद्रशेखर यांची प्रमुख उपस्थिती होती.

ही मोहीम यशस्वी करणाऱ्या प्रत्येक घटकाबद्दल या वेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली, तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्रेही प्रदान करण्यात आली. ‘सामूहिक प्रयत्नातून सार्वजनिक आरोग्य आणि प्राणी कल्याणाप्रती केलेले हे अत्यंत महत्वपूर्ण कार्य आहे आणि रेबीजमुक्त मुंबईसाठीच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. या मोहिमेला मिळालेल्या दमदार यशाबद्दल अभिमान वाटतो,’ अशी भावना मिशन रेबीज मुंबईचे प्रकल्प प्रमुख डॉ. अश्विन सुशीलन यांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad