Lok Sabha Election - ‘भाजपा’म्हणजे खंडणी गोळा करणारी टोळी - उद्धव ठाकरे


हिंगोली - निवडणूक रोख्यांच्या यादीवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. भारतीय जनता पार्टी म्हणजे खंडणी गोळी करणारी टोळी असल्याचे म्हणत ठाकरेंनी भाजपला खोचक टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसीय हिंगोली दौ-यावर असून, आपल्या पहिल्याच सभेत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

यावेळी आपल्या भाषणात बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘यांना घरफोडीचे अधिकृत परवाना दिला पाहिजे. तसेच, कमळाचे चिन्हाच्या जागी त्यांना हातोडा चिन्ह दिले पाहिजे घरफोडीसाठी, भाजप आता शासकीय यंत्रणा वापरून खंडणी गोळा करणारा पक्ष झाला आहे. सगळ्या सरकारी यंत्रणा बाजूला करा मग पाहा जनता काय करते. तुम्ही म्हणायचे ‘अच्छे दिन आयेंगे, पण आता सच्छे दिन आयेंगे’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

कालच्या सभेत केलेल्या भाषणाच्या सुरवातीवरून माझ्यावर टीका झाली आहे. देशाला वाचवायचा असल्याने मी माझ्या भाषणाची सुरुवात, जमलेल्या तमाम माझ्या देशभक्त, देशप्रेमी बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो अशी केली. भाषणाची अशी सुरुवात केल्याने भाजपचे खुळखुळे वाजायला लागले. काही जणांच्या मानगुटीवर जे भूत बसलेला आहे, असे मोदी भक्त बोंबलायला लागले. मला त्या मोदी भक्तांना विचारायचे आहे, तुम्ही देशभक्त नाहीत का?, आम्ही सर्व देशभक्त आहे. माझ्यावर ज्या भाजपच्या खुळखुळ्यांनी टीका केली, त्यांना मी विचारतो तुमचे हिंदुत्व काय?, तुम्ही मोदी भक्त आहात की देशभक्त आहात. आम्ही मोदी भक्त नाही हे उघडपणे सांगतो, असे ठाकरे म्हणाले.

गावात मोदी सरकारचा रथ तुम्हीच कारवाई करा -
यापुढे तुमच्या गावात मोदी सरकारचा रथ आला तर पोलिसांना कारवाई करायला सांगा. त्यांनी कारवाई केली नाही तर तुम्ही कारवाई करा. आचारसंहिता लागली असून मोदी आणि आपण आता सगळे सारखे आहोत. त्यांना वेगळा न्याय आणि आपल्याला वेगळा न्याय असे खपवून घेतलं जाणार नाही. त्यांना जर प्रचार करायचा असेल तर त्याचा सर्व खर्च त्यांच्या खात्यामध्ये लावला गेला पाहिजे.

तुम्हाला शिवसेना कळलेलीच नाही -
हिंगोलीतील हळद प्रक्रिया प्रकल्प मी मंजूर केला. पण काही जणांना वाटते की, तो प्रकल्प त्यांनी पूर्ण केला. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारी लोक तिकडे गेले. आता तुम्हाला लोक परत हळद लावतात का पहा, गद्दारी गद्दारी किती करायची. सगळे काही दिले, आमदार केले, खासदार केले , काहीजणांना मंत्रिपद दिले. तरी देखील यांची भूक क्षमत नाही. इथल्या पालकमंत्र्यांने सुप्रिया सुळे यांना शिवी दिली होती. असले लोकं बाजूला ठेवून आम्ही हिंंदुत्ववादी असल्याचे हे म्हणतात. महिलांचा आदर करण्याचा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले. मात्र हे महिलांना शिवी देत आहेत, तरीही त्यांना मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसवतात. लाज, लज्जा, शरम काहीच नाही, तरीही शिवसेनेचे नाव घेतात. नालायकांनो तुम्हाला शिवसेना कळलेली नाही.

Post a Comment

0 Comments