सिने अभिनेता गोविंदा यांचा शिवसेनेत प्रवेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 March 2024

सिने अभिनेता गोविंदा यांचा शिवसेनेत प्रवेश


मुंबई - बॉलिवुड सुपरस्टार गोविंदा आहूजा याने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्ष कार्यालय बाळासाहेब भवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात गोविंदा यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. सरकारच्या विकास कामांवर प्रभावित होऊन गोविंदा पक्षात आलेले आहेत. सरकारची कामे गोविंदा जनतेपर्यंत पोहोचवतील. ज्यातून महायुतीला फायदा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवजयंतीच्या पवित्र दिनी सगळ्यांचे लाडके,  
विनम्र असलेले अभिनेते गोविंदा यांचे शिवसेना पक्षात स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो. गोविंदा यांनी मुंबईतील सकारात्मक बदलांबाबत समाधान व्यक्त केले. सर्वच क्षेत्रात एक सकारात्मकता आणि समृद्धी दिसून येत आहे. मुंबईतील विकास कामांनी प्रभावित होऊन ते आपल्या सोबत आले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नकारात्मकता दूर झाली आणि सकारात्मकता तयार झाली. कामे सुरु झाली आणि अर्थचक्राला चालना मिळाली. हे सरकार विकासाचे व्हीजन हाती घेऊन काम करणारे आहे. घरात बसून काम करणारे नाही तर रस्त्यावर उतरुन काम करणारे हे सरकार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

बॉलिवुड इंडस्ट्री खूप मोठी आहे. आर्टिस्ट, बॅकस्टेज आर्टिस्ट अशी प्रचंड मोठी इंडस्ट्री आहे. यातील प्रश्न सोडवण्यासाठी गोविंदा इच्छुक आहेत. सरकारने हा मुद्दा हाती घेतला आहे. सरकार आणि फिल्म इंडस्ट्रीमधील दुवा म्हणून गोविंदा काम करतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.  

आम्ही महायुती म्हणून ४८ जागा लढवत असून जास्तीत जास्त जागा जिंकणार आहोत. मागील दीड पाऊणेदोन वर्षात सरकारने केलेली कामे लोकांनी पाहिली आहेत. समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी सरकारने काम केले आहे. महायुतीचे सरकार येण्यापूर्वी राज्यात सण उत्सव बंद होते. महायुतीचे सरकार आल्यानंतर पहिला सण दहिहंडी अर्थात गोविंदा होता. आज गोविंदा आपल्यात आला आहे हा देखील योगायोग आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
 
कलाकाराचा कधीही अपमान करु नये. एक कलकार खूप मेहनत करुन नावारुपाला येतो. एका कलाकाराचा अपमान म्हणजे संपूर्ण चित्रपट सृष्टीचा अपमान आहे. ज्यांनी टीका केली असेल त्यांना भोगावे लागेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर दिली.

अभिनेता गोविंदा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. ते पुढे म्हणाले की आजच्या दिवशी शिवसेना पक्षात प्रवेश करणे ही देवाची कृपा आहे. मी २००४ ते २००९ पर्यंत मी राजकारणात होतो. २००९ मध्ये राजकरणातून बाहेर पडलो. १४ वर्षांच्या वनवासानंतर पुन्हा सुरुवात करताना रामराज्य जिथे आहे त्याच पक्षात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कृपेने आलो आहे अशी भावना गोविंदा यांनी व्यक्त केली. १४ वर्षानंतर मी पुन्हा सक्रिय राजकारणात आलो आहे. हा ईश्वरी कृपेचा भाग आहे. विश्वातील सर्वोत्तम फिल्म सिटी साकारण्याचे काम आदरणीय एकनाथ शिंदे यांच्याबरोबर पूर्ण करता येईल, असा विश्वास गोविंदा यांनी यावेळी व्यक्त केला.

गोविंदा यांनी केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक - 
महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. कला आणि संस्कृतीबाबत दिलेली जबाबदारी मी योग्य प्रकारे पार पाडेन. सिनेमा सृष्टी ही कला आणि संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. जगभरात मुंबईची फिल्म सिटी आधुनिकतेचा पाया आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईत अनेक बदल दिसून आले आहेत. मुंबई सुंदर दिसू लागली आहे. हवा बदलली आहे. मुंबईच्या सौंदर्यात दिवसागणीक भर पडत आहे. आपण शहरांबाबत ज्या कल्पना करत होते त्या सत्यात उतरल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा स्वच्छ असल्याचे गोविंदा म्हणाले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad