वर्षभरात ३ हजार १९६ कोटी रुपये मालमत्ता कर संकलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 April 2024

वर्षभरात ३ हजार १९६ कोटी रुपये मालमत्ता कर संकलन



मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराचे काल (दिनांक ३१ मार्च २०२३) रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजे सन २०२३-२०२४ या वित्तीय वर्षात ३ हजार १९५ कोटी ९१ लाख ११ हजार रूपये इतके संकलन करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना महानगरपालिकेद्वारे विविध नागरी सेवा-सुविधा देण्यात येतात. या अनुषंगाने 'मालमत्ता कर' हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. हा 'मालमत्ता कर' नागरिकांनी वेळेत महानगरपालिकेकडे भरणा करावा, यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करनिर्धारण व संकलन खात्याने वर्षभर प्रयत्न केले आहेत. परिणामी, दिनांक ३१ मार्च, २०२४ पर्यंत मालमत्ता कराची वसुली ही ३ हजार १९५ कोटी ९१ लाख ११ हजार रूपये इतकी झाली आहे, अशी माहिती सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) सुनील धामणे यांनी दिली आहे.

करनिर्धारण व संकलन विभागातर्फे आर्थिक वर्ष २०२३-२०२४ ची सुधारित मालमत्ता कर देयके फेब्रुवारी २०२४ अखेरीस निर्गमित झाल्यानंतर निर्धारित कालावधीत कर भरण्याबाबत नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात आले. निर्धारित कालावधीत नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा करता यावा, यासाठी साप्‍ताहिक तसेच सार्वजनिक सुट्टींच्‍या दिवशी नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवण्‍यात आली. मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करण्‍यात आले. तसेच, मागील थकबाकी वसुलीसाठी परिश्रम घेण्‍यात आले. परिणामी, दिनांक १९ मार्च २०२४ रोजी एकाच दिवसात तब्बल १०० कोटी रुपये, दिनांक २८ मार्च २०२४ रोजी ३०४ कोटी रूपये, दिनांक २९ मार्च २०२४ रोजी १७१ कोटी रूपये, दिनांक ३० मार्च २०२४ रोजी १७१ कोटी रूपये आणि दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी १९० कोटी ३४ लाख रुपयांचे विक्रमी संकलन करण्‍यात करनिर्धारण व संकलन विभागाला यश आले.

दिनांक १ एप्रिल, २०२३ ते ३१ मार्च, २०२४ या आर्थिक वर्षामध्ये सर्वाधिक मालमत्ता कर संकलन हे ‘एच पूर्व’ विभागामध्ये रुपये ३३६.४५ कोटी इतके झाले आहे. त्या खालोखाल ‘के पूर्व ’ विभागामध्ये ३१७.४८ कोटी रुपये इतकी, ‘जी दक्षिण’ विभागामध्ये २५७.११ कोटी रुपये मालमत्ता कर संकलन झाले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तिन्ही भागातील मालमत्ता कर संकलनाचा विचार केल्यास सर्वाधिक कर संकलन हे पश्चिम उपनगरांमध्ये १,५९०.०९ कोटी रुपये, शहर भागात ९१७.०५ कोटी रुपये आणि पूर्व उपनगरांमध्ये ६७८.४२ कोटी रुपये इतके मालमत्ता कर संकलन झाले आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिका हद्दीत एकूण मालमत्तांची संख्‍या ९ लाख ५५ हजार ३८ इतकी आहे. त्‍यापैकी ५०० चौरस फूट (४६.४५ चौरस मीटर) व त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱया निवासी इमारती / निवासी सदनिकांना संपूर्ण मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. या मालमत्तांची संख्‍या ३ लाख ५६ हजार ६५२ इतकी आहे. तर, उर्वरित ५ लाख ९८ हजार ३८६ मालमत्तांना कर आकारणी केली जाते. सन २०२३-२४ मध्‍ये २ लाख ५३ हजार ६०५ मालमत्ता धारकांनी मिळून एकूण वर्षात ३ हजार १९५ कोटी ९१ लाख ११ हजार रूपयांचा कर भरणा केला आहे.

सुधारित देयके निर्गमित केल्यानंतरच्या अल्पावधीत केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) सुनील धामणे तसेच करनिर्धारण व संकलन खात्यातील अधिकारी, कर्मचारी आणि विभाग कार्यालय स्तरावर कार्यरत सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. तसेच उर्वरित कर संकलनासाठी पाठपुरावा सुरु ठेवण्याच्या सुचनाही केल्या आहेत.

आर्थिक वर्षातील (२०२३-२०२४) प्रशासकीय विभागनिहाय मालमत्ता कर संकलन-
१) ए विभाग – १५३ कोटी ०१ लाख रूपये
२) बी विभाग – २२ कोटी ३३ लाख रूपये
३) सी विभाग - ४१ कोटी ९३ लाख रूपये
४) डी विभाग - ११४ कोटी ४१ लाख रूपये
५) ई विभाग – ६९ कोटी ४६ लाख रूपये
६) एफ दक्षिण विभाग – ५७ कोटी ८५ लाख रूपये
७) एफ उत्तर विभाग – ६९ कोटी २३ लाख रूपये
८) जी दक्षिण विभाग – २५७ कोटी ११ लाख रूपये
९) जी उत्तर विभाग - १३१ कोटी ७२ लाख रूपये
१०) एच पूर्व विभाग – ३३६ कोटी ४५ लाख रूपये
११) एच पश्चिम विभाग – १८५ कोटी ५३ लाख रूपये
१२) के पूर्व विभाग – ३१७ कोटी ४८ लाख रूपये
१३) के पश्चिम विभाग – २३८ कोटी २८ लाख रूपये
१४) पी दक्षिण विभाग – १६७ कोटी २१ लाख रूपये
१५) पी उत्तर विभाग – ११५ कोटी ०३ लाख रूपये
१६) आर दक्षिण विभाग – ८५ कोटी ७४ लाख रूपये
१७) आर मध्य विभाग – १०५ कोटी ०७ लाख रूपये
१८) आर उत्तर विभाग - ३९ कोटी ३० लाख रूपये
१९) एल विभाग – १३९ कोटी ३४ लाख रूपये
२०) एम पूर्व विभाग – ५५ कोटी ०८ लाख रूपये
२१) एम पश्चिम विभाग - ७३ कोटी रूपये
२२) एन विभाग – १०३ कोटी ०८ लाख रूपये
२३) एस विभाग – २२६ कोटी २२ लाख रूपये
२४) टी विभाग – ८१ कोटी ७० लाख रूपये
२५) शासन मालमत्‍ता – १० कोटी ३५ लाख रूपये
एकूण – ३ हजार १९५ कोटी ९१ लाख ११ हजार रूपये

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad