संजय निरुपम यांची कॉंग्रेसमधून हकालपट्टी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

संजय निरुपम यांची कॉंग्रेसमधून हकालपट्टी

Share This

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाविरोधात उघडपणे भूमिका घेणारे माजी खासदार संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी दुपारीच संजय निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आता संजय निरुपम यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले. संजय निरुपम यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

यापूर्वी काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत संजय निरुपम यांना स्थान दिले होते. मात्र, संजय निरुपम मुंबईतील लोकसभेच्या एकूण ६ जागांपैकी ४ जागा ठाकरे गटाला देण्यात आल्यामुळे सातत्याने नाराजी व्यक्त करत होते. मुंबईतील सर्व जागांवर ठाकरे गटाचा पराभव होईल, असे भाकीतही त्यांनी वर्तविले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईत उद्धव ठाकरे यांची ताकदच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे मुंबईतील चार ते पाच जागा ठाकरे गटाला देणे, कशाप्रकारे काँग्रेसची घोडचूक आहे, असा प्रचार आणि वक्तव्यं संजय निरुपम सातत्याने करत होते. संजय निरुपम यांच्या या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण होताना दिसत होता. त्यामुळे काँग्रेस पक्षाने संजय निरुपम यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.

राजीनामा देण्यापूर्वीच खेळ संपला -
नाना पटोले यांनी बुधवारी संध्याकाळी संजय निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर संजय निरुपम यांनी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये संजय निरुपम यांनी एकप्रकारे नाना पटोलेंनी दिलेल्या इशा-याची खिल्ली उडवली होती. काँग्रेस पक्षाने माझ्यासाठी जास्त ऊर्जा आणि स्टेशनरी वाया घालवू नये. त्याऐवजी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या खुर्च्या आणि उर्जेचा उपयोग पक्ष वाचवण्यासाठी करावा. मी काँग्रेस पक्षाला एक आठवड्याचा वेळ दिला होता, तो आज पूर्ण होत आहे. उद्या मी स्वत: निर्णय जाहीर करेन, असे संजय निरुपम यांनी म्हटले. संजय निरुपम यांची ही भाषा पाहता ते पक्षात फार काळ राहणार नाही, याचा अंदाज आला होता. काँग्रेसने आज त्यांच्यावर कारवाई केली नसती तरी गुरुवारी संजय निरुपम यांनीच पक्षाचा राजीनामा दिला असता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages