काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बनवणारच - मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बनवणारच - मुख्यमंत्री

Share This


अमरावती - काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन (Maharashtra Bhavan in Kashmir) बनविण्यासाठी राज्य सरकारला जमीन मिळाली आहे. मात्र उमर अब्दुल्ला यांनी मुंबईत येऊन काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बनवू देणार नाही, अशी वल्गना केली. मात्र आमच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah)आहेत. त्यामुळे महाराष्ट्र भवनाला विरोध करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बनवणारच असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. (Marathi latest News)

अमरावती मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. ते म्हणाले की कला नगरचा एक अब्दुल्ला उमरला खांदयावर घेऊन नाचत आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळत केली.

गृहमंत्री अमित शाह हे रामभक्त आणि हनुमान भक्तही आहेत. काही नेते राज्यात आता फिरु लागले आहेत. ते सुनांवर बोटे मोडू लागले आहेत. अमित शाह यांचे महाराष्ट्रासोबत वेगळे नाते आहे. जावयाचे स्वागत करण्याची महाराष्ट्राची परंपरा असून ती आम्ही कधीही विसरणार नाही. देशाचा कर्तबगार गृहमंत्री महाराष्ट्राचा जावई असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

अहंकारी रावणाच्या सरकारने कारवाई करून उमेदवार नवनीत राणा यांना तुरुंगात पाठवले होते. हनुमान यांनी अहंकारी रावणाची लंका जाळली होती. त्याप्रमाणे इथले मतदार महाविकास आघाडी रुपी रावणाच्या लंकेला जाळून राख करतील. नवनीत राणा मताधिक्यांनी विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

काश्मीरमधून कलम ३७० हटवणे अशक्य असल्याचे विरोधक म्हणत होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० हटवून काश्मीर भारताचा भाग बनवला. आता जम्मू काश्मीरचा वेगाने विकास होत आहे. अमित शाह यांच्या निर्णयामुळे काश्मीर शांत राहिले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य पिछाडीवर होते. बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरु केले. जनतेसाठी नवीन योजना सुरु केल्या. जनतेला फक्त मोदी गॅरंटीवर विश्वास आहे. महाविकास आघाडीतील नेते महिलेला अपशब्द वापरतात, अशा पक्षाच्या उमेदवारांना तुम्ही मत देणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हिंदुत्वाचा गळा घोटणाऱ्यांना अमित शाह सोडणार नाहीत -
अमित शाह बंद दरवाजाआड कोणताही शब्द देत नाहीत. त्यांचे बोलणे खुलेआम असते. परंतु सत्तेच्या लालसेपोटी बाळासाहेब ठाकरे यांची खोटी शपथ घेऊन हिंदुत्वाचा गळा घोटणाऱ्यांना गृहमंत्री अमित शाह सोडणार नाहीत, असा गर्भित इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages