प्रचार गीतामधून ‘जय भवानी’ शब्द काढणार नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 April 2024

प्रचार गीतामधून ‘जय भवानी’ शब्द काढणार नाही


मुंबई - उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच निवडणूक आयोगाने बजावलेली नोटीस धुडकावली आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यानुसार, निवडणूक आयोगाने मशाल गीतामधून ‘हिंदू’ आणि ‘जय भवानी’ हे दोन शब्द काढण्यास सांगितले आहे. पण, उद्धव ठाकरे यांनी जय भवानी हा शब्द गीता मधून काढणार नाही असं म्हणत निवडणूक आयोगाशी थेट पंगा घेतला आहे.

आमच्या मशाल चिन्हाच्या गीतामध्ये ‘जय भवानी, जय शिवाजी’ असे एक कडवे आहे. त्यातील जय भवानी हा शब्द काढण्याचा फतवा निवडणूक आयोगाकडून काढण्यात आला आहे. पण, आम्ही कोणत्याही परिस्थितीत भवानी हा शब्द काढणार नाही. आमच्यावर कारवाई करणार असाल तर मोदी-शहा यांच्यावरही तुम्ही कारवाई करणार आहात का? हे आम्हाला सांगावे. मोदी-शहांमध्ये महाराष्ट्रातील देवांबाबत इतका द्वेष आहे हे आता कळत आहे, असे ते म्हणाले आहेत.

मागे निवडणूक आयोगाकडे तक्रार नाही तर विचारणा केली होती. अटलजी पंतप्रधान असताना बाळासाहेबांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार काढून घेतला होता. सहा वर्ष त्यांच्यावर निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली होती. धर्माच्या नावावर भाजप निवडणुका लढवत आहेत. त्यांना सुट देण्यात आली आहे का?

अमित शहा म्हणतात निवडून आल्यानंतर अयोध्येचे दर्शन घडवू. पंतप्रधान मोदी म्हणताहेत बजरंग बलीचे नाव घेऊन बटन दावा. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे विचारणा केली होती. पण आयोगाने आम्हाला उत्तर दिलं नाही. तसा नवा नियम केला असेल तर आम्हीही असा प्रचार केला तर तुम्हाला आमच्यावर कारवाई करता येणार नाही किंवा तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई केली ते आधी सांगा असं ठाकरे म्हणाले.

आमची निशाणी बदलली आहे. प्रेरणा गीत आहे. प्रेरणेसाठी एक गीत लागते. मशाल चिन्ह घेऊन एक गीत बनवले आहे. निवडणूक आयोगाकडे आम्ही गीत घेऊन गेलो होतो. निवडणूक आयोगाने आम्हाला दोन शब्द काढण्यास सांगितले आहेत. गीतामध्ये ‘हिंदू तुझा धर्म, जाणून घे हे मर्म, जीव त्यास कर तू बहाल’ असं कडवे आहे. यातील हिंदू शब्द काढण्यास सांगितले आहे. हिंदू धर्म काढायला लावणे योग्य आहे का? असा सवाल ठाकरेंनी केलाय.

आम्ही हिंदू धर्माच्या आधारावर मत मागितले नाही. आम्ही हिंदूत्व सोडले म्हणणा-यांनी आणि निवडणूक आयोगाने आम्हाला उत्तर द्यावे. बजरंग बली की जय म्हणून बटन दावा असे म्हटले जाते आहे. आम्ही देखील बजरंगबलीचे भक्त आहोत. महाराष्ट्रामध्ये आई तुळजा भवानी कुलदैवत आहे. तुळजा भवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना आर्शीवाद दिला आहे. जय भवानी, जय शिवाजी ही घोषणा लोकांच्या मनामनात आहे. आम्हाला निवडणूक आयोगाला आठवण करुन द्यायचे आहे. उद्या जर आम्ही हर हर महादेव किंवा जय भवानी, जय शिवाजी असे म्हटले तर चालेल का? आम्ही हे बोलणारच आहोत यावर कुणाचा आक्षेप असायला नको, असं ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad