मुंबईत दरवर्षी पावसाचे प्रत्यक्ष आगमन होण्यापूर्वी महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगरातील मोठ्या नाल्यांमधून गाळ काढला जातो. तर विभाग कार्यालयांच्या स्तरावर लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे केली जातात. नाल्यांमधून गाळ काढल्याने पावसाळी पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी मदत मिळते. पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधून किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करुन गाळ उपशाचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. मुंबई महानगरातील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, हे उद्दिष्ट ठरविले जाते. त्यानुसार, यंदा १० लाख २१ हजार ७८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. पैकी, आतापर्यंत (दिनांक २१ एप्रिल २०२४) ४ लाख ८६ हजार ३७८ मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या ४७.६० टक्के गाळ काढण्यात आला आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे मार्चच्या पहिल्या आठवड्यात यंदाही कामे सुरु झाल्यानंतर वेगाने सर्व कामे पूर्ण करण्यात येत आहेत. गाळ काढण्याची ही सर्व कामे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण करावीत, आवश्यक तेथे अतिरिक्त यंत्रणा, मनुष्यबळ नेमून कामांना वेग द्यावा, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी यंत्रणेला दिले आहेत. त्यानुसार, शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तीनही विभागांमध्ये कामे जलदगतीने करण्यात येत आहेत. नाल्यांमधून उद्दिष्टाएवढे किंवा त्याहूनही अधिक गाळ काढण्याचे काम दिनांक ३१ मे २०२४ अखेरपर्यंत पूर्ण करण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे. या मुदतीत ही कामे पूर्ण होतील, असा प्रशासनाला ठाम विश्वास आहे. त्यादृष्टीने नियोजन करून संपूर्ण यंत्रणेने कार्यवाहीला सुरुवात केली आहे.
काढण्यात आलेल्या गाळाबाबत तपशील -
१) शहर विभागातील विविध नाल्यांमधून ३० हजार ९४० मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. पैकी आतापर्यंत १० हजार ४४० मेट्रिक टन गाळ काढला. हे प्रमाण ३३.७४ टक्के आहे.
२) पूर्व उपनगरातील विविध नाल्यातून १ लाख २३ हजार ५५३ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. पैकी आतापर्यंत ५९ हजार ३४४ मेट्रिक टन गाळ काढला असून हे प्रमाण ४८.०३ टक्के आहे.
३) पश्चिम उपनगरातील विविध नाल्यातून २ लाख ३५ हजार ०२१ मेट्रिक टन गाळ काढला जाणार आहे. पैकी आतापर्यंत ९९ हजार ८०२ मेट्रिक टन गाळ काढला असून हे प्रमाण ४२.४७ टक्के आहे.
४) मिठी नदीतून २ लाख १६ हजार १७४ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. पैकी, आतापर्यंत १ लाख ४५ हजार ८०८ मेट्रिक टन गाळ काढला आहे. हे प्रमाण ६७.४५ टक्के आहे.
५) मुंबईतील सर्व लहान नाले मिळून ३ लाख ६३ हजार ५३३ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. पैकी आतापर्यंत १ लाख ४९ हजार २३० मेट्रिक टन गाळ काढला आहे. हे प्रमाण ४१.०५ टक्के आहे.
६) महामार्गांलगतच्या नाल्यांमधून एकूण ५२ हजार ५६० मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. पैकी आतापर्यंत २१ हजार ७५२ मेट्रिक टन गाळ काढला असून हे प्रमाण ४१.३९ टक्के आहे.
No comments:
Post a Comment