विरारला चार सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 April 2024

विरारला चार सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यूवसई - विरारच्या ‘ग्लोबल सिटी’ येथील एका खासगी सांडपाणी प्रकल्पाच्या टाकीत साफसफाई करण्यासाठी उतरलेल्या ४ सफाई कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी सांडपाणी प्रकल्पाची देखभाल करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या दोघांना अटक केली आहे.

विरार पश्चिमेच्या ‘ग्लोबल सिटी’ येथे रुस्तमजी बिल्डरचे ३ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहेत. त्यापैकी रुस्तमजी शाळेला लागून असलेल्या एका सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात ही दुर्घटना घडली. या सांडपाणी प्रकल्पाच्या देखभालीचे काम ‘पॉलिकॉन’ कंपनीला देण्यात आले होते. मंगळवारी सकाळी कंपनीचे ४ कामगार नियमित साफसफाई करण्यासाठी गेले होते. एक कामगार बराच वेळ झाला तरी आला नसल्याने अन्य कर्मचारी त्याला पाहण्यासाठी आत गेले आणि त्यांचा देखील गुदमरून मृत्यू झाला.

वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान ब्रिदिंग ऑपरेटर सेट परिधान करून टाकीच्या पाण्यात उतरले आणि त्यांनी आतील कर्मचाऱ्यांचे मृतदेह बाहेर काढले. शुभम पारकर (२८), अमोल घाटाळ (२७), निखिल घाटाळ (२४) आणि सागर तांडेलकर (२९) अशी या दुर्घटनेत मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या दुर्घटनेप्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी ‘पॉलिकॉन’ कंपनीच्या दोघा जणांना अटक केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages