भर पावसात उद्धव ठाकरे बरसले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भर पावसात उद्धव ठाकरे बरसले

Share This

परभणी - मी वादळात उभा राहणार आहे, तुम्ही राहणार आहात की नाही, मी संकटाशी झुंज देणारा आहे, तुम्ही देणार आहात की नाही, कितीही पाऊस पडला तरी मी हटणार नाही. मी लढण्यासाठी उभा राहिलो आहे. कितीही संकटे येऊ द्यात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील आम्ही मर्द मावळे आहोत. त्या संकटाला आम्ही चिरडून टाकले, तर हे संकट काहीच नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

महाविकास आघाडीचे परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. मात्र, उद्धव ठाकरे यांचे संबोधन सुरू होताच पावसाला सुरुवात झाली. मात्र, भर पावसात उद्धव ठाकरे यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. भाजपाला वाटत असेल की सर्व काही पैशाने खरेदी करता येते, तर तसे नाही. ही आपली परीक्षा आहे. वादळाला अंगावर घ्यायला मर्दाची छाती लागते, ती आपल्याकडे आहे. आम्ही पाठीवरून वार करत नाही. वादळाच्या छातीवर वार करणारे शिवरायांचे मावळे आहोत, असा एल्गार उद्धव ठाकरेंनी केला.

मोदी-शाह यांचा नोकर असलेला निवडणूक आयोग आहे, त्यांनी आपल्या प्रचारगीतातील जय भवानी शब्द काढायाला सांगितला आहे. तुमचा जो महाराष्ट्राबाबत आकस आहे, त्याचा आम्ही फडशा पाडू. तुम्हाला उद्धव ठाकरेला संपवायचे आहे ना, हिंमत असेल तर, पाहा प्रयत्न करून, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिले. आम्हीही जय श्रीराम असा जयघोष करतो. पण जय भवानी याबाबत तुमच्या मनात द्वेष आणि आकस का आहे, अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली. तसेच अब की बार भाजपा तडीपार अशा घोषणा दिल्या.

दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानावर मोदी-शाह काही बोलायला तयार नाहीत. सुप्रिया सुळेंवर खालच्या भाषेत टीका केली जाते. अशा असंस्कृत माणसांना एकही मत महाराष्ट्रातून मिळता कामा नये, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले. काही बोलण्यासाठी भाजपाकडे मुद्दे राहिलेले नाहीत. म्हणून घराणेशाहीवर बोलतात. मोदींचे नाणे महाराष्ट्रात चालत नाही. मोदींचा चेहरा महाराष्ट्रात चालत नाही. म्हणून गद्दारांच्या माध्यमातून तुमच्याकडे मते मागण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी सडकून टीका केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages