मुंबई - लोकल म्हणजे मुंबईकरांची ( Mumbai Local) जीवनवाहिनी समजली जाते. मात्र, याच लोकलचा प्रवास आता जीवघेणा ठरु लागला आहे. बहुतेक जणांच्या कामाच्या वेळा सारख्याच असल्याने दिवसाच्या काही विशिष्ट वेळांमध्ये लोकलला इतकी गर्दी होते की लोक अक्षरशः लटकत, लोंबकळत, धक्काबुक्की करत प्रवास करतात. मात्र, या सगळ्या प्रकारामुळे रेल्वे प्रवासात २०२४ मध्ये १ जानेवारीपासून ते ३१ मार्चपर्यंत तब्बल ५६५ लोकांचा मृत्यू झाला आहे. सगळ्यात सुखकर, स्वस्त आणि आरामदायी प्रवास मुंबईकरांच्या जीवावर उठल्याचे चित्र आहे.
मुंबईमधील वाढती गर्दीही याला कारणीभूत आहे. या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. कोरोनानंतर प्रवाशांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. मात्र, त्या तुलनेत सर्वसाधारण लोकलच्या फेऱ्या वाढलेल्या नाहीत. रेल्वे प्रशासन केवळ वातानुकूलित लोकल आणण्याच्या मागे आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. शिवाय लोकलच्या फेर्या वाढत नसतील तर मुंबई महानगर प्रदेशातील कर्मचार्यांच्या कामाच्या वेळांमध्ये बदल व्हावा, ज्यामुळे एकाच वेळी गर्दी होणार नाही, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
लोकल गर्दीचे बळी वाढत असल्याने प्रवासी संघटनांनी डोंबिवली येथे शुक्रवारी आंदोलनाचा निर्णय घेतला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे रेल्वे संघटनांना आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली आहे. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत जीआरपी चर्चा करणार असून, त्यातून तोडगा निघेल, असा विश्वास रेल्वे संघटनांनी व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment