भाभा रूग्णालयात अतिरिक्त सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 May 2024

भाभा रूग्णालयात अतिरिक्त सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला येथील खान बहादूर भाभा रुग्णालयात रुग्ण आणि कर्मचारी यांच्यातील वादाच्या प्रसंगानंतर कर्मचारी वर्गाने दिनांक २ मे २०२४ रोजी काम बंद आंदोलनाचा पावित्रा घेतला होता. या घटनेनंतर रूग्णाने पोलीस ठाण्यात कर्मचारी वर्गाची माफी मागितल्याने हा वाद संपुष्टात आला. त्यानंतर संपूर्ण कर्मचारी वर्गदेखील पुन्हा कामावर रूजू झाला. या घटनेनंतर खान बहादूर भाभा रूग्णालय प्रशासनाने काही तातडीच्या उपाययोजना करत सुरक्षा व्यवस्था आणि प्रवेश यंत्रणा प्रभावीपणे वापरण्याचा निर्णय घेतला आहे. (Mumbai News)

खान बहादूर भाभा रूग्णालयात एका महिला रूग्णाला (वय – १७) दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता तात्काळ वैद्यकीय विभागात (EMS) दाखल करण्यात आले होते. त्यानंतर १ मे २०२४ रोजी दुपारी या रूग्णाला सदर रूग्णालयातील चौथ्या मजल्यावरील महिला रूग्ण कक्षात स्थलांतरित करण्यात आले होते. रात्री ११.०० वाजता दाखल रूग्णांना औषधे व इंजेक्शन देण्याची वेळ होती. तसेच कक्षामध्ये स्वच्छतेची कामे सुरू असल्याने परिचारिका यांनी कक्षामध्ये असलेल्या‍ रूग्णांच्याच नातेवाईकांना बाहेर जाण्यास सांगितले. यावेळी रूग्ण महिलेजवळ जाऊन तिच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना देखील बाहेर जाण्यास सांगितले. परंतु रूग्णाच्या नातेवाईकांनी बाहेर जाण्यास नकार देत ते तिथेच बसून राहिले. त्यातून वाद होवून रूग्णाने दोन्ही परिचारिकांना यावेळी शिवीगाळ केली.

त्यानंतर रूग्णाची रूग्णालयातील घरी जाण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रूग्ण बाहेर गेला. मात्र थोड्या वेळाने म्हणजे रात्री सुमारे ११.३० वाजता अजुन काही नातेवाईकांना घेऊन रूग्ण महिला पुन्हा त्याठिकाणी आले. रूग्णाने पुन्हा परिचारिकांसोबत वाद घातला. कर्तव्यावर उपस्थित परिचारिकांना अश्लघ्य शिवीगाळ करून त्यांच्या कानशिलात मारले. हा सर्व घटनाक्रम लक्षात घेता शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी डॉक्टर आणि परिचारिका यांनी मिळून कुर्ला पोलिस ठाणे येथे प्रथम खबर अहवाल (एफआयआर) दाखल केला. घटनेनंतर सर्व कर्मचारी वृंदांने वैद्यकीय अधीक्षक यांच्या दालनासमोर कामबंद आंदोलन पुकारले. कर्मचारी वर्गाने संबंधित रूग्णाला अटक केल्याशिवाय कर्तव्यावर रूजू होणार नाही, अशी मागणी केली. कर्मचारी वर्गाचे एकीकडे आंदोलन सुरू असताना, दुसरीकडे रूग्णालयात कंत्राटी तत्वावर असलेले परिचारिका व डॉक्टर्स यांच्या सहाय्याने रूग्णसेवा अविरत सुरू होती.

वैद्यकीय अधीक्षक यांनी आपल्या दालनात वरिष्ठ पोलिस निरिक्षक, उप प्रमुख सुरक्षा अधिकारी यांनाही तातडीने बोलविले. वरिष्ठ पोलिस निरिक्षक यांनी कर्मचा-यांशी व कर्मचारी संघटना प्रतिनिधींशी प्रत्यक्ष चर्चा करून स्पष्ट केले की, सदर रूग्ण ही किशोरवयीन व महिला असल्यामुळे तसेच रात्रीच्या वेळी अटक करता येत नाही. परंतु, सदर घटनेबाबत योग्य ती पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले. या आश्वासनाने कर्मचा-यांचे व कर्मचारी संघटना प्रतिनिधींचे समाधान झाले नाही. कुर्ला पोलिस ठाण्यात रूग्णाच्या नातेवाईकांना बोलवून युनियन प्रतिनिधी व वैद्यकीय अधीक्षक, अधिसेविका व संबंधित कर्मचारी यांच्या समक्ष माफी मागितली. त्यानंतर सर्व कर्मचारी पुन्हा कर्तव्यावर हजर झाले.

या घटनेची दखल घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उप प्रमुख सुरक्षा अधिकारी परिमंडळ - ५ यांनी महानगरपालिकेचे अतिरिक्त सुरक्षा रक्षक देण्याचे निर्देश दिले आहेत. अतिरिक्त सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकीचा प्रस्ताव रूग्णालय प्रशासनामार्फत पुढील कार्यवाहीसाठी देण्यात आला आहे. तसेच नातेवाईकांसाठी असलेली प्रवेशिका पद्धत परिणामकारकपणे वापरण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक हे कक्षामध्ये थांबण्यासाठीच्या वेळेवर नियंत्रण आणणे शक्य होईल. तसेच या वेळांव्यतिरिक्त कोणताही नातेवाईक कक्षामध्ये थांबणार नाही. सुरक्षा रक्षकांकडूनच प्रवेशिकांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे रूग्ण आणि कर्मचारी यामधील वादाचे प्रसंग टाळणेही शक्य होईल. रूग्णालयात सुरक्षा रक्षकांची संख्या वाढण्यासोबतच कर्मचारी वर्गाचेही समुपदेशन करण्यात येईल, असे रूग्णालय प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad