नाला रूंदीकरण प्रकल्पांना नागरिकांनी सहकार्य करावे - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 May 2024

नाला रूंदीकरण प्रकल्पांना नागरिकांनी सहकार्य करावे - मुख्यमंत्री


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नाला रूंदीकरण कामे अनेक ठिकाणी सुरू आहेत. अरूंद ठिकाणी पाणी तुंबून वसाहतींमध्ये पाणी शिरण्याचा धोका पाहता स्थानिकांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाला सहकार्य करावे. नाला रूंदीकरणात अतिक्रमण ठरणाऱ्या बांधकामे हटवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी विरोध करू नये. अशा प्रकल्पात बाधितांना मोबदला किंवा पर्यायी निवासाची व्यवस्था करण्यात येईल, त्यांना पूर्ण न्याय दिला जाईल, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. (Mumbai Latest News)

मुंबई महानगरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून विविध ठिकाणी नाल्यातून गाळ उपसण्याची कामे पूर्णत्वाकडे सरकत आहेत. शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरे अशा तिन्ही विभागात आज (दिनांक २६ मे २०२४) प्रत्यक्ष भेटी देऊन, नदी-नाल्यातील गाळ उपसा कामांची प्रत्यक्ष पाहणीतून स्थिती जाणून घेतल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी प्रसार माध्यम प्रतिनिधीशी त्यांनी संवाद साधला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या पावसाळापूर्व तयारीच्या कामांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच नियोजित वेळेत सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले. 

मुख्यमंत्री शिंदे यांनी  जे. के. केमिकल नाला (वडाळा), ए. टी. आय नाला (चुनाभट्टी), मिठी नदी (वांद्रे-कुर्ला संकुल), मजास नाला (जोगेश्वरी), दहिसर नदी (दहिसर पश्चिम) या ठिकाणी भेट दिली. नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. खडक लागेपर्यंत गाळ काढावा, अशा सूचना प्रशासनाला करतानाच नाल्यातून गाळ काढणार्‍या कामगारांसोबत मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट संवादही साधला. 

शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री मुंबई शहर दीपक केसरकर, आमदार मंगेश कुडाळकर, आमदार रवींद्र वायकर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, सर्व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त उपस्थित होते. 

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, पावसाचे पाणी योग्य रीतीने आणि वेगाने वाहून जाण्यासाठी नाल्यांचे रुंदीकरण केले जाते. अशा नाले रुंदीकरण कामांमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था करण्यात येईल. त्यामुळे सर्वांनी या कामासाठी सहकार्य करावे. नाले रूंदीकरण न झाल्याने जोरदार पावसाप्रसंगी पाण्याचा वेगाने निचरा झाला नाही तर वसाहतींमध्ये पाणी शिरून स्थानिक पातळीवर वित्त व जीवित हानी होण्याची शक्यता असते. नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांचा दर्जा वाढवल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार कमी झाले आहेत, असे सांगून गतवर्षाप्रमाणे यंदा देखील नाल्यातून गाळ उपसा कामामध्ये खडक लागेपर्यंत खोलीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या. 

नाल्यातून गाळ काढण्याची निश्चित उद्दिष्टपूर्ती करताना आकडेवारीच्या पलीकडे जाऊन अधिकाधिक गाळ काढण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या. रेल्वेच्या परिसरात पावसाळापूर्व कामांचा आढावा आणि पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणी केलेल्या उपाययोजना पाहण्यासाठी रेल्वेसोबत संयुक्त पाहणी करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यंदाच्या पावसाळ्यापूर्वीच्या तयारीत बृहन्मुंबई महानगरपालिका, रेल्वे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, म्हाडा यांनी संयुक्तपणे तयारी करणे आणि नियोजनाप्रमाणे प्रत्यक्षात समन्वय राखून कामकाज करणे महत्त्वाचे ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. 

मुंबइतील लहान आणि मोठ्या नाल्यांची स्वच्छता कामे करताना त्यावर देखरेख ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत आहेत. खासगी संकुलातील नाले स्वच्छता कामांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. आवश्यक ते सगळे पाठबळ आणि साधनसामग्री उपलब्ध करून दिली जाईल, मात्र कोणत्याही स्थितीत पावसाळ्यात मुंबईकरांना त्रास होणार नाही, याबाबत खबरदारी घ्या, अशा सूचना त्यांनी दिल्या. ज्याठिकाणी पाणी साचणार नाही, अशा भागातील अधिकारी वर्गाचा सत्कार करण्यात येईल, तर कुचराई करणार्‍यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. 

दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यंदा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या घरांमध्ये संबंधित नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. त्याबाबतचे निर्देश संबंधित प्राधिकरणाच्या बैठकीत देण्यात आले आहेत. तसेच दरड प्रवण क्षेत्रात संरक्षक जाळ्या लावण्याच्या सूचनाही दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

नागरिकांना नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांबाबत, कचरा, डेब्रीज याबाबत कोणतीही तक्रार असल्यास समर्पक अशा व्हॉट्सअँप हेल्पलाईनचा पर्यायही नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणच्या कचरा विषयक तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी नागरिकांनी मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉट्सॲप हेल्पलाइन 81696 81697 वर संपर्क साधावा, असे आवाहन देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

मुंबईत मिठी नदी आणि दहिसर नदी याठिकाणी सुरू असलेल्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या माध्यमातून नद्यांचे पाणी स्वच्छ करण्यात येणार आहे. मलजल प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून नद्यांच्या स्त्रोतात सांडपाणी मिसळण्याच्या आधीच त्या पाण्यावर प्रक्रिया करण्यात येईल. एकूण सात मलजल प्रक्रिया प्रकल्पाचे काम मुंबईत प्रगतीपथावर असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad