मान्सून अंदमानात दाखल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मान्सून अंदमानात दाखल

Share This


पुणे - उन्हाचा कडाका आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर आली असून, आता मान्सून मालदीव, कोमोरिनच्या काही भागासह बंगालच्या उपसागरातील काही भाग, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. गेल्या २४ तासांत निकोबार बेटावर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. दरम्यान, ३१ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकते. त्यानंतर वातावरण अनुकूल राहिल्यास जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकते. (Monsoon Updates)

या अगोदरच हवामान खात्याने मान्सून १९ मे रोजी अंदमानात धडकेल, असा अंदाज वर्तवला होता. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला. सध्या मान्सूनला अनुकूल वातावरण असल्याने ते वेगाने पुढे सरकेल आणि ३१ मेपर्यंत ते केरळात दाखल होईल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. सध्या मे महिना अर्ध्यावर येऊन ठेपला आहे. विदर्भासह महाराष्ट्रातील तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या वर कायम आहे. कडक उन्हापासून आणि उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी लोक मान्सूनची वाट पाहत आहेत. त्यातच आता अंदमान आणि निकोबार बेटांवर आता मान्सून धडकल्याने मान्सूनची चाहुल लागली आहे.

अंदमानातून येणारे मोसमी वारे केरळपर्यंत पोहोचायला दहा दिवस लागतात. मान्सूनचा हाच कल असाच सुरू राहिल्यास ३१ मे पर्यंत तो केरळमध्ये दाखल होईल. तत्पूर्वी केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकलमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडेल. या राज्यांमध्ये १९ आणि २० मे रोजी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नैऋत्य मान्सून ३१ मे रोजी केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. २२ मे रोजी केरळमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. २१ मे २०२४ रोजी २०४.५ मिमी पेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे. मेघालयात १९ आणि २० मे रोजी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.

तीन दिवस आधी धडकला मान्सून -
पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी मान्सूनबाबत ट्विट केले आहे. त्यांनी १९ मे रोजी मान्सून अंदमानात दाखल झाल्याची माहिती दिली. प्रत्येक वेळी मान्सून २२ मे पर्यंत अंदमानात दाखल होतो. मात्र यंदा तीन दिवस आधी म्हणजेच १९ मे रोजी मान्सून पोहोचला आहे. मान्सूनचे आगमन होताच अंदमानमध्ये पावसाला सुरुवात झाली, असे होसाळीकर म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages