केईएम रुग्णालयात केस पेपरसाठी लागणारा प्रतीक्षा कालावधी कमी करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 May 2024

केईएम रुग्णालयात केस पेपरसाठी लागणारा प्रतीक्षा कालावधी कमी करा


मुंबई - राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयात येणाऱया रुग्णांचा ओघ अधिक असतो. अशा स्थितीत त्यांना केस पेपरसाठी जास्त प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी बाह्य रुग्ण खिडकीजवळ अधिक मनुष्यबळ नेमावे, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.

केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त तयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच रुग्णालयातील पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज (दिनांक १४ मे २०२४) रुग्णालयात प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी रुग्णालयातील विविध विभागांना त्यांनी भेटी दिल्या. याप्रसंगी रुग्ण खिडकीजवळ रुग्णांशी संवाद साधत असताना त्यांनी केस पेपर संदर्भातील निर्देश दिले.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, अधिष्ठाता डॉ. संगीता रावत तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पाहणी दरम्यान आयुक्त महोदयांनी रुग्णालयाच्या विविध कक्षातील सुविधांची बारकाईने पाहणी केली. सध्या रुग्णालयात सहा कक्षांची कामे सुरू आहेत. त्याचीही त्यांनी माहिती घेतली. ही कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

केईएम रुग्णालयात शतक महोत्सवी वर्षानिमित्त तयारीचा देखील सविस्तरपणे गगराणी यांनी आढावा घेतला. जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत शतक महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे रुग्णालयात आयोजन करण्यात आले आहे. शतक महोत्सवी वर्षानिमित्त या उपक्रमांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण प्रशासनाने सहभागी होण्यासाठी सूचना करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

केईएम रुग्णालय पुनर्विकास अंतर्गत नवीन इमारतींचे बांधकाम प्रकल्प प्रगतिपथावर आहेत. त्यामध्ये सर्व्हीस टॉवर, कर्मचारी भवन, परिचारिका वसतिगृह या इमारतीचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश गगराणी यांनी दिले. रुग्णालयाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रमवारी अधिक उंचावण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केईएम रुग्णालय प्रशासनाला दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages