मुंबई उपनगरात 2290 मतदारांनी बजावला गृहमतदानाचा हक्क - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 May 2024

मुंबई उपनगरात 2290 मतदारांनी बजावला गृहमतदानाचा हक्क



मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले आणि दिव्यांग अशा 2,735 मतदारांनी गृह मतदानासाठी नोंदणी केलेली आहे. त्यापैकी दोन हजार 290 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व आणि 29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघांचा समावेश आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार 85 वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात अशा मतदारांची संख्या दोन हजार 735 एवढी आहे. या मतदारांच्या घरी मतदान पथके पाठवून टपाली मतपत्रिकेद्वारे त्यांच्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मतदान पथकांमध्ये एक मतदान अधिकारी, सहाय्यक, एक सूक्ष्म निरीक्षक, एक पोलिस, एक व्हीडिओग्राफर यांचा समावेश आहे.

नोंदणी केलेल्या 85 वर्षांपेक्षा जास्त वय आणि दिव्यांग मतदारांना मतदानाच्या वेळापत्रकाची माहिती संबंधित उमेदवारांना देण्यात आली आहे. उमेदवार अशा मतदान पथकांसमवेत त्यांचे प्रतिनिधी मतदानाच्या वेळी त्यांचा प्रतिनिधी उपस्थित ठेवू शकतात. गृहमतदानाच्या वेळी मतदाराच्या गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घेऊन या सर्व प्रक्रियेचे व्हीडिओ चित्रीकरण देखील करण्यात येत आहे. आतापर्यंत दोन हजार 290 मतदारांचे गृहमतदान पूर्ण झाले आहे. गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी समाधान व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad