मतदार जनजागृतीसाठी मुंबई शहर जिल्ह्याचा विशेष उपक्रम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 May 2024

मतदार जनजागृतीसाठी मुंबई शहर जिल्ह्याचा विशेष उपक्रम

 

मुंबई - 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४' च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृतीविषयक विविध उपक्रम सातत्याने सुरू आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून आज महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित राज्याच्या मुख्य समारंभात विविध उपक्रमांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. यामध्ये सेल्फी पॉईंट, सह्यांची मोहीम यासह प्रत्यक्ष संवादावर भर देऊन मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला, अशी माहिती 'स्वीप' च्या मुख्य समन्वय अधिकारी फरोग मुकादम यांनी दिली. (Special activities for voter awareness)

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याचा मुख्य समारंभ हा दादर पश्चिम परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आज सकाळी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी मतदार जनजागृती विषयक संदेशांसह सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते. त्याचबरोबर येत्या दि. २० मे २०२४ रोजी "मी अवश्य मतदान करणारच !" या संदेशासह सह्यांसाठीचे फलक देखील उभारण्यात आले होते. या दोन्ही उपक्रमांना उपस्थित मान्यवरांनी व परिसरातील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

आजच्या आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचेही औचित्य लक्षात घेत या समारंभप्रसंगी विविध क्षेत्रातील कामगार देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अवश्य मतदान करण्याचे वचन घेऊन आम्ही मतदान करणारच, असा संकल्प त्यांनी यावेळी केला. यामध्ये प्रामुख्याने रेल्वे स्टेशनवर काम करणारे हमाल बांधव, अंगणवाडी सेविका, कम्युनिटी हेल्थ वर्कर, परिचारिका, होमगार्ड, पोलीस, मुंबई अग्निशमन दल, राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.), राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.), बांधकाम कामगार, नाका कामगार व घरेलू कामगार यासारख्या विविध क्षेत्रातील कामगारांचा यात समावेश होता. प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित असणाऱ्या या कामगारांनी कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांना व परिसरातील नागरिकांना येत्या २० मे २०२४ रोजी आवर्जून मतदान करण्याचे आवाहन केले, अशीही माहिती मुकादम यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages