ऐतिहासिक बाणगंगा तलावाचे पुनरुज्जीवन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 May 2024

ऐतिहासिक बाणगंगा तलावाचे पुनरुज्जीवन


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलावाचे पुनरुज्जीवीकरण कामे सुरू असून लवकरच पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण होतील. सध्या तलाव परिसरातील ऐतिहासिक १६ दीपस्तंभांचे पुनरुज्जीवन दृष्टिपथात आहे. याशिवाय, तलावातील दगडी पायऱ्यांची दुरुस्ती व सुधारणा, तलावाच्या सभोवती असणारा वर्तुळाकार रस्ता 'भक्ती परिक्रमा मार्ग' म्हणून विकसित करणे, मंजूर रस्ता रेषा असलेली १८.३० मीटर रुंद अशी बाणगंगा तलावाकडे जाणारी 'मिसिंग लिंक' विकसित करणे, तलावाच्या दगडी पायऱ्यांवरील अतिक्रमण हटविणे, अशा प्रमुख कामांचा समावेश आहे, अशी माहिती सहायक आयुक्त (डी विभाग) शरद उघडे यांनी दिली.

डी विभागात विविध नागरी सेवा-सुविधा देण्यासोबतच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उप आयुक्त (परिमंडळ-१) डॉ. संगीता हसनाळे, सहायक आयुक्त (डी विभाग) शरद उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली वारसा स्थळे जतन करण्याची तसेच त्यांची देखभाल करण्याची कार्यवाही केली जात आहे. ऐतिहासिक वारसा ठिकाणांपैकी एक म्हणजे बाणगंगा तलाव आणि त्यालगतचा परिसर होय. वाळकेश्वर (मलबार हिल) परिसरात हा तलाव आहे.

महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवास्तूशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६० अन्वये बाणगंगा तलाव महाराष्ट्र शासनाने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. या तलावाभोवती मंदिरे, समाधी, धर्मशाळा, मठ असून हे स्थान राष्ट्रीय महत्व असलेले सांस्कृतिक केंद्र आहे. तलावाला लागूनच व्यंकटेश बालाजी मंदिर, सिद्धेश्वर शंकर मंदिर, राम मंदिर, बजरंग आखाडा, वाळूकेश्वर मंदिर इत्यादी प्रसिद्ध मंदिरे आहेत. पुरातन काळापासून बाणगंगा तलावास धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असल्याने या ठिकाणी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या तलावाचे प्राचीन कालीन महत्व लक्षात घेता देशविदेशातील पर्यटक हजारोंच्या संख्येने येथे भेट देतात.

बाणगंगा तलावाचे ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक व प्राचीनकालीन महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ रोजी बाणगंगा तलाव (वाळकेश्वर, मलबार हिल) परिसर क्षेत्रास 'ब' वर्ग पर्यटन स्थळ घोषित केले आहे. बाणगंगा तलावाचे पुनरुज्जीवन व पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण सोयी-सुविधा विकास करण्याची टप्पेनिहाय कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.

सहायक आयुक्त शरद उघडे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, बाणगंगा तलावाचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व आहे. अकराव्या शतकाच्या पौराणिक संदर्भांमध्ये या तलावाच्या पाऊलखुणा आढळून येतात. या भागात विविध देवीदेवतांची मंदिरे, रामकुंड आदी धार्मिक स्थळेही आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पाठपुराव्याने या भागात विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी पुरातत्व विभाग आणि गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्ट यांचे सहकार्य लाभत आहेत. त्यानुसार, संपूर्ण परिसराचा विकास करण्याची कामे सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात तलाव प्रवेश पायऱ्यांवरील १३ झोपड्या काढण्यात आल्या आणि त्यातील राहिवाश्यांचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नजीकच्या इमारतीत पुनर्वसन करण्यात आले. विशेष म्हणजे, यासाठी महानगरपालिका प्रशासनाला कोणतीही नुकसानभरपाई द्यावी लागली नाही. येथील दीपस्तंभांचे पुनरुज्जीवन करताना त्यांच्या वास्तविकतेला कोणतीही हानी पोहोचू नये आणि त्यांचे तत्कालीन रूप आहे त्या स्थितीतच दिसावे, या अनुषंगाने त्याकाळी वापरण्यात आलेल्या नैसर्गिक पदार्थांचा वापर करण्यात आला आहे. ज्यामध्ये उडीद डाळ, मेथी, जवस, गूळ, बेलफळ यांच्यापासून तयार करण्यात आलेल्या मिश्रणाचा समावेश आहे. तलावातील गाळ काढताना तलावाच्या तळाशी तसेच आसपास असलेल्या पुरातन दगडांची हानी होऊ नये, यासाठी पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली कुशल मनुष्यबळाच्या साहाय्याने गाळ काढला जात आहे, अशी माहितीही उघडे यांनी दिली.

तीन टप्प्यात होणार पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरण -
बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरणाची कामे तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात बाणगंगा तलावातील दगडी पायऱ्यांची सुधारणा, तलाव परिसरातील दीपस्तंभांची पुर्नउभारणी, आकर्षक विद्युत रोशणाई, तलावाच्या सभोवती असलेला वर्तुळाकार रस्ता 'भक्ती मार्ग' म्हणून विकसित करणे, मंजूर रस्ता रेषा असलेली १८.३० मीटर रुंद अशी बाणगंगा तलावाकडे जाणारी 'मिसिंग लिंक' (Missing Link) विकसित करणे, तलावाच्या दगडी पायऱ्यावरील अतिक्रमण हटविणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यात बाणगंगा तलावातून दिसणाऱ्या इमारतींचे दर्शनी भाग एकसमान पद्धतीने रंगरंगोटी करणे, तलावास लागून असलेल्या इमारतींच्या भिंतींवर भित्तिचित्रे चितारणे व शिल्पे घडविणे, रामकुंड या ऐतिहासिक व पवित्र स्थळाचे पुनरुज्जीवन, तलाव परिसरातील मंदिरांचा सर्वंकष विकास आराखडा तयार करुन योजनाबद्ध पद्धतीने रूपरेषा ठरविणे आणि बाणगंगा तलावाकडे जाण्यासाठी असलेल्या दगडी पायऱ्यांची व रस्त्यांची सुधारणा इत्यादी कामांचा समावेश आहे.

तिसऱ्या टप्प्यात बाणगंगा तलाव ते अरबी समुद्र या दरम्यान विस्तृत मार्गिका बनविणे व सदर जागेत असलेल्या झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करून त्याठिकाणी वाराणसीच्या धर्तीवर उद्याने, खुली बैठक व्यवस्था, सार्वजनिक जागा निर्माण करणे, डॉ. भगवानलाल इंद्रजीत मार्गाचे रुंदीकरण करणे व रस्ता रेषेत बाधित निवासी-अनिवासी बांधकामांचे पुनर्वसन आदी कामे केली जाणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages