मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात ‘झिरो कॅज्युएल्टी मिशन’ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 May 2024

मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात ‘झिरो कॅज्युएल्टी मिशन’


मुंबई - येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेसह आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व यंत्रणांनी मिळून यंदा ‘झिरो कॅज्युएल्टी मिशन’च्या(Zero Casualty Mission) दिशेने व योग्य समन्वय राखून एकत्रितपणे कार्यवाही करावी. सुविधांच्या अभावामुळे किंवा गैरसोयीमुळे प्राणहानी अथवा वित्तहानी होणार नाही, याची खबरदारी घेऊन पावसाळापूर्व सर्व कामे योग्य वेळेत आणि योग्य प्रकारे पार पाडावीत, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. (Mumbai News)(Marathi News)

मुंबईतील पावसाळापूर्व तयारीसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज (दिनांक २४ मे २०२४) बैठक पार पडली, यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर तसेच विविध प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. 

या आढावा बैठकीत बोलताना, यंदा साधारणपणे दिनांक १० ते ११ जूनदरम्यान मुंबईत पावसाचे आगमन होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. तत्पूर्वी सर्व पावसाळापूर्व कामे पूर्ण करावीत. यंदा पावसाळ्यात २२ दिवस समुद्रामध्ये ४.५ मीटरपेक्षा उंच लाटांची भरती येऊ शकते. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात समुद्रकिनारी अधिक सुरक्षा व्यवस्था करावी. यासाठी महानगरपालिकेने पोलिसांसोबतच कोळीवाड्यातील प्रशिक्षित नागरिकांचीही मदत घ्यावी. मुंबईत गतवर्षीप्रमाणे यंदाही जोरदार पावसामुळे पाणी तुंबणार नाही यासाठी पाणी साचणाऱ्या ठिकाणी पंप बसवावेत. जेणेकरून पाऊस जास्त झाल्यास पाण्याचा तत्काळ निचरा करता येईल. नदी, नाल्यांमधून गाळ काढण्याचे काम महानगरपालिकेकडून वेगाने सुरू असले तरी केवळ मेट्रीक टनात गाळाचे मोजमाप न करता कुठेच पाणी साचणार नाही, याची अधिक दक्षता घ्यावी. गाळ काढताना नाल्यात खोलवर खडक लागत नाही, तोपर्यंत उपसा करावा. नाल्यांचे पातमुख रुंद करून तिथे खोलवर गाळ उपसा करावा तसेच मुखाच्या ठिकाणी साठवणूक टाकी बनवता येईल का, याचाही विचार करावा. तरंगता कचरा उचलण्यासाठी नाल्यात कायमस्वरुपी संयंत्रे लावावी. ज्या ज्या यंत्रणांच्या कार्यक्षेत्रात राडारोडा, कचरा आहे तो लागलीच उचलून त्या भागातील स्वच्छता करा, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

मुंबईत पाणी तुंबण्याची ४५३ ठिकाणे महानगरपालिकेने शोधली आहेत. त्यापैकी ३५५ ठिकाणी पाणी तुंबणार नाही, या दृष्टीने कामे करण्यात आली आहेत आणि ९८ ठिकाणची कामे प्रगतीपथावर आहे. त्यामुळे, नागरिकांना यंदाही पाणी तुंबण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. महानगरपालिकेच्या वतीने मनुष्य प्रवेशिकांवर (मॅनहोल) १ लाख संरक्षक जाळ्या बसविण्यात येणार आहे. त्यामुळे मॅनहोलची झाकणे चोरी होण्याच्या प्रकारांवर आळा बसेल. तथापि, पावसाळ्यात खुल्या मनुष्य प्रवेशिकांमुळे (मॅनहोल) कुणालाही त्रास होता कामा नये. मॅनहोलवरील झाकणे चोरी करणाऱ्यांवर केवळ भंगार चोरीचे कलम न लावता गंभीर कलम लावून कठोर गुन्ह्याची नोंद करा, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. 

मुंबईत सध्या १२२४ किलोमीटर अंतराच्या सिंमेट रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्त्यांच्या काँक्रीटीकरणामुळे रस्त्यांवर आगामी काळात खड्डा दिसणार नाही. हे काम लवकरच पूर्णत्वास येईल. दरम्यान, पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डयांमुळे नागरिकांना त्रास होणार नाही, म्हणून तत्काळ खड्डे बुजविण्यासाठी मास्टीकचा वापर करावा, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या वतीने झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याचे काम हाती घेण्यात आले असले तरी खासगी परिसरात किंवा गृहनिर्माण संस्थांच्या परिसरात असलेल्या झाडांच्या फांद्याचीही छाटणी व्हायला हवी. महानगरपालिकेने यासंदर्भात कार्यवाही करावी.  

घाटकोपर येथे जाहिरात फलक (होर्डिंग) कोसळून नागरिकांना नाहक जीव गमवावा लागला. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून जाहिरात फलकांसाठी ठरवून दिलेल्या नियमांना सर्व यंत्रणांनी काटेकोरपणे पालन करावे. अधिकृत जाहिरात फलकांचीदेखील तत्काळ संरचनात्मक स्थिरता तपासावी तसेच अनधिकृत जाहिरात फलक तत्काळ पाडून टाकावे. दरडप्रवण क्षेत्रामध्ये सुरक्षित जाळींचे कवच लावावे. महानगरपालिकेच्या वतीने २७५ अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. अशा अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांसाठी तात्पुरते निवारे उभे करावे किंवा पुनर्वसन सदनिकांची उपलब्ध असलेली घरे दुरुस्त करून त्यांना वापरास द्याव्यात. पावसाळ्यातील साथरोगांसाठी रुग्णालये पूर्ण क्षमतेने सज्ज ठेवावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. दरम्यान, पुरेशा प्रमाणात पाऊस पडत नाही तोवर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांना केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad