भीम आर्मीचा दणका, पालिका आयुक्त पवईतील भीमनगरवासीयांसोबत बैठक घेणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 June 2024

भीम आर्मीचा दणका, पालिका आयुक्त पवईतील भीमनगरवासीयांसोबत बैठक घेणारमुंबई - पवई येथील भीम नगर (Powai Bheem Nagar) झोपडपट्टीवर पालिकेने (BMC Mumbai) तोडक कारवाई केली. या कारवाई दरम्यान रहिवाशांनी दगडफेक केली तर पोलिसांकडून रहिवाशांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. पालिकेने घरे तोडल्याने भर पावसात येथील रहिवासी रस्त्यावर आपले कुटुंब घेवुन राहत आहेत. पालिकेच्या या कारवाईचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. याची दखल घेत येत्या बुधवारी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी रहिवाशांना तसेच भीम आर्मी संघटनेला भेटीसाठी वेळ दिली आहे. (Residents of Bhimnagar will have a meeting with the Municipal Commissioner)

भीम नगरवर कारवाई - 
लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी लागल्यानंतर ६ जून रोजी पवईतील भीम नगर या मागासवर्गीयबहुल  वस्तीवर मुंबई महानगरपालिकेने बुलडोजर फिरवला. या कारवाईमुळे शेकडो कुटुंब रस्त्यावर आली. लहान बालकांपासून, महिला, वयोवृद्ध यांना भर  पावसात दिवस काढावे लागत आहेत. त्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात कोणतीही तोडक कारवाई करण्यात येऊ नये असे न्यायालयाचे आदेश असतानाही ऐन पावसाळ्यात कोणतीही पूर्वकल्पना न देता या ठिकाणी निष्कासनाची कारवाई करण्यात आली. 

भीम आर्मीचे आंदोलन - 
माणुसकीला काळिमा फासण्याचे कृत्य करणाऱ्या प्रशासकीय, पोलीस, व पालिका यंत्रणा तसेच संबंधित व्यक्तीविरोधात कारवाई करावी, रस्त्यावर आलेल्या सर्व झोपडीवासीयांची घरे त्वरित उभारण्यात यावीत, रस्त्यावर आलेल्या सर्व रहिवाश्यांना तात्पुरता निवारा तसेच त्यांना सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात. या मागणीसाठी भीम आर्मी मुंबई प्रदेशच्यावतीने पवई प्लाझा या ठिकाणी स्थानिक नागरिकांना घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले. भीम आर्मीचे मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांच्यासह भीम नगरमधील शेकडो स्थानिक रहिवासी सहभागी झाले होते. 

पोलिसांवर कारवाई, आयुक्तांची बैठक - 
दरम्यान ज्या पोलिसांनी स्थानिक रहिवाश्यांवर लाठीचार्ज व मारहाण केली त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले. तर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनीदेखील या गंभीर प्रकरणात लक्ष्य घातले असून या विषयावर चर्चा करण्यासाठी भीम आर्मी तसेच स्थानिक रहिवाशांना येत्या बुधवारची वेळ दिली असल्याची माहिती अशोक कांबळे यांनी दिली. जोपर्यंत भीम नगर रहिवाश्याना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad