Mumbai News - बाणगंगा तलावाला हानी पोहचवणाऱ्या कंत्राटदाराविरोधात एफआयआर दाखल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 June 2024

Mumbai News - बाणगंगा तलावाला हानी पोहचवणाऱ्या कंत्राटदाराविरोधात एफआयआर दाखल


मुंबई - ऐतिहासिक अशा बाणगंगा तलाव (Banganga Lake) व परिसर पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत कामे करताना तलावाच्या उत्तर प्रवेशद्वारावरून आत मध्ये एक्सकॅव्हेटर यंत्र (Excavator) उतरवून तलावांच्या पायऱ्यांची हानी केल्याबद्दल संबंधित कंत्राटदारास महानगरपालिकेच्या (BMC) वतीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच तलावास हानी पोहोचवून नुकसान केल्याबद्दल मलबार हिल (Malbar Hill) पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हानी पोहोचलेल्या पायऱ्या दुरुस्त करण्याची कामे पूर्ववत करण्यात आली आहेत अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (FIR filed against the contractor who damaged the Banganga lake) (Mumbai News) 

बाणगंगा ही पुरातन वास्तु आहे. अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे तलावाच्या पायऱ्या, पायऱ्यांचे दगड, दीपस्तंभांची दुरावस्था झाली होती. तसेच तलाव परिसरात पायऱ्यांवरील बांधकामे झाली होती. यास्तव, महाराष्ट्र राज्य शासनाच्या स्तरावर झालेल्या बैठकांनुसार तसेच राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री, स्थानिक आमदार तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत बाणगंगा तलाव व परिसर पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प महानगरपालिकेचा विशेष प्राधान्य प्रकल्प म्हणून घोषित करुन महानगरपालिकेने त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली. निविदा प्रक्रियेअंती पुरातन वारसा कामे (हेरिटेज) कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. 

पुनरुज्जीवन प्रकल्पाचा एक भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत तलावातील सर्व बांधकामांचे निष्कासन करण्यात आले. तसेच दीपस्तंभांची दुरूस्ती करण्यात आली आहे. तसेच, प्रारंभी गाळ काढण्यासाठी हस्तचलित यंत्रणा उभी करण्यात येऊन गाळ काढण्यात येत होता. तथापि, कंत्राटदाराने दिनांक २४ जून २०२४ रोजी एक्सकॅव्हेटर संयंत्र (Excavator) बाणगंगा तलावाच्या उत्तर दिशेच्या प्रवेशद्वाराने उतरवले. याबाबतची माहिती मिळताच डी विभागाने सदर काम थांबविले. तसेच, सदर संयंत्र बाहेर काढले आहे.

दरम्यान, स्थानिक आमदार तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज (दिनांक २५ जून २०२४) बाणगंगा तलाव येथे स्थळ पाहणी केली. यावेळी त्यांनी संयंत्रामुळे हानी झालेल्या पायऱ्या लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर, बाणगंगा प्रकल्पाचे कंत्राटदार मे. सवानी हेरिटेज कन्झर्वेशन प्रायव्हेट लिमिटेड यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. तसेच, मलबार हिल पोलिस ठाणे येथे एफआयआर (क्रमांक FIR-CR No.155/2024 Dt.25/06/2024) दाखल करण्यात आला आहे. 

तसेच, संयंत्रामुळे हानी पोहोचलेल्या पायऱ्या दुरुस्त करण्याची कामे तात्काळ हाती घेण्यात आली. हानी पोहोचलेल्या पायऱ्या व काढून ठेवलेले दगड यांची पुनर्स्थापना करण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून पूर्ववत स्वरूपात झाले आहे. तदअनुषंगाने पुढील योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. तसेच उर्वरीत कामेदेखील यापुढच्या काळात नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार आहेत, असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.  

बाणगंगा तलाव पुनरुज्जीवन प्रकल्प -  
१. बाणगंगा तलावातील दगडी पायऱ्यांची सुधारणा करणे.

२. बाणगंगा तलाव परिसरातील दीपस्तंभांचे पुनरुज्जीवन करणे.

३. बाणगंगा तलावामध्ये आकर्षक विद्युत रोशणाई करणे.

४. बाणगंगा तलावाच्या दगडी पायऱ्यांवरील अतिक्रमण हटविणे.

५. रामकुंड या ऐतिहासिक व पवित्र स्थळाचे पुनरुज्जीवन करणे.

६. बाणगंगा परिसरातील मंदिरांचा सर्वंकष विकास आराखडा तयार करणे व योजनाबद्ध पद्धतीने रूपरेषा ठरविणे.

७. बाणगंगा तलावाकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्यांची सुधारणा करणे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad