आषाढी यात्रेसाठी एसटी ५ हजार विशेष बसेस सोडणार...! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 June 2024

आषाढी यात्रेसाठी एसटी ५ हजार विशेष बसेस सोडणार...!



मुंबई - आषाढी यात्रेनिमित्त (Ashadhi Yatra) विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपुरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्राकाळात ५ हजार विशेष बस (ST will leave 5000 special buses) सोडण्याचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

सालाबाद प्रमाणे श्री श्रेत्र पंढरपुर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवाशी येतात. अनेक प्रवाशी स्वत:च्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखीं बरोबर चालत दिंडीने येतात या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. ४० पेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. अर्थात या प्रवासात देखील ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सुट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत. मागील वर्षी एसटीने आषाढी यात्रे निमित्त ४२४५ विशेष बसेस सोडल्या होत्या. याव्दारे यात्रा काळामध्ये १८ लाख, ३० हजार, ९३४ भाविक प्रवाशांची सुखरूप ने-आन एसटीने केली होती.

फुकटया प्रवाशांना लगाम -
यात्रा काळामध्ये गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे, वाहकाकडून तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे अशा फुकटया प्रवाशांना अटकाव करण्यासाठी एसटीचे २०० सुरक्षा कर्मचारी व अधिकारी यात्रा काळात २४ तास नजर ठेवून असणार आहेत.

वाहतूकीच्या नियोजनासाठी एसटीची मदत -
एकादशीच्या दिवशी लाखो भाविक प्रवासी आपल्या गावाकडे मार्गस्थ होतात अशा वेळी रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन प्रवासाचा खोळंबा होतो यंदा स्थानिक पोलीस प्रशासनाच्या खांदयाला खांदा लावून ३६ पेक्षा जास्त वाहतूक नियंत्रक व सुरक्षा रक्षक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करणार आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलीस प्रशासनाला एसटीची मदत होणार आहे.

चार तात्पूरर्ती बस स्थानके उभारणार -
पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक… अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बस स्थानकाचे नाव                        जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बसेस

चंद्रभागा बसस्थानक                      मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर आगार

भिमा यात्रा देगाव                           छत्रपती संभाजी नगर , नागपूर व अमरावती प्रदेश

विठ्ठल कारखाना                            नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर

पांडुरंग बसस्थानक                        सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad