Mumbai News - मुंबई महानगराच्या सर्वांगिण विकासावर भर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 June 2024

Mumbai News - मुंबई महानगराच्या सर्वांगिण विकासावर भरमुंबई - धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाचे काम वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. या प्रकल्पावर विविध यंत्रसामुग्रीसह बृहन्मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा दिवसरात्र काम करीत आहे. हा संपूर्ण प्रकल्प लवकरच मुंबईकरांसाठी खुला करण्यात येईल. यासह मुंबईतील सिमेंट काँक्रिटचे रस्ते, मुंबईचे सौंदर्यीकरण, सखोल स्वच्छता अभियान, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आदी उपक्रमांतून मुंबई महानगराच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दिनांक १४ जून २०२४) मध्यरात्रीच्या सुमारास भेट देऊन विविध कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी मरीन ड्राइव्ह पासून उत्तरेला जाणाऱया मार्गावरील आंतरमार्गिका, रस्ते, सागरी पदपथ आदी प्रगतिपथावरील कामांचा आढावा घेतला.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) गिरीश निकम आदींसह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडण्यासाठी दोन तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) टाकून दोन वाहिन्या तयार करण्यात येत आहेत. त्यापैकी एक वाहिनी जुलै २०२४ अखेर पूर्ण करुन त्या वाहिनीवरुन दक्षिण मुंबईकडे येणारी तसेच उत्तरेकडे जाणारी वाहतूक खुली करण्याचे नियोजन करा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली. मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू समुद्रात एकमेकांना जेथे सांधले जातात तेथील दोन खांब्यांमधील अंतर ६० मीटरवरून १२० मीटरपर्यंत नेण्यात आले. कोळी बांधवांची गैरसोय टळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भविष्यात मासेमारी करताना कोळी बांधवांना कोणतीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

प्रकल्पाविषयी शिंदे म्हणाले की, मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. वेळेची सुमारे ७० टक्के बचत, तर इंधनात ३४ टक्के बचत होणार आहे. तसेच ध्वनिप्रदूषण व वायू प्रदूषणातही घट होण्यास मदत होणार आहे. यासह पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी देखील महानगरपालिका आणि मुंबई पोलिस यांचे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. पावसाळ्यात मुंबईकरांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी देखील विविध पातळीवर महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाच्या कामांची पाहणी करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: रोडरोलर चालवून प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणाऱया कामगारांचे मनोबल वाढविले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad