मुंबई - मुंबईत बुधवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असल्याने शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. मालाड, गोरेगाव, सांताक्रूझ, जुहू, वांद्रे, कुर्ला आणि घाटकोपर भागात काही प्रमाणात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. (Heavy rain in Mumbai)
भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या ३-४ तासांत मुंबईच्या काही भागात ५०-६० किमी प्रतितास वेगाने वा-यासह मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरीमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे अंधेरी सबवे वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कुर्ला शीतल टॉकीज, दहिसर, घाटकोपर ते कुर्ला एल बी एस रोड आदी ठिकाणी पाणी साचले. पाणी साचल्याने येथील बेस्ट बस आणि इतर वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली. मुंबईत रात्रीपासून सुरू असलेल्या तुफान पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली.
No comments:
Post a Comment