पुणे - ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरण, त्यानंतर पोर्शे अपघातावेळी ससूनमधील गैरप्रकार समोर आले. त्यानंतर आता बेवारस रुग्णांवर उपचार करून त्यांना रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी सोडून येत असल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले. याप्रकाराचा व्हिडिओ समोर आल्याने ससून रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले.
पुणे शहरातील बेवारस जखमी व्यक्तींसाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड काम करतात. त्यांनी एका बेवारस रुग्णाला ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. परंतु दुसऱ्याच दिवशी तो रुग्ण गायब होता. या संदर्भात चौकशी केल्यावर रुग्णाला रात्री डॉक्टर घेऊन गेले परत आणले नाही, अशी माहिती त्यांना मिळाली. यामुळे त्या रुग्णासोबत गैरप्रकार झाल्याची शंका दादासाहेब गायकवाड यांना आली. यानंतर गायकवाड यांनी रुग्णालयाबाहेर काही दिवसांपासून पाहणी केली.
सोमवारी मध्यरात्री दीड वाजता रितेश गायकवाड रिक्षाचालक बनून रुग्णालयाबाहेर उभे होते. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर आदी यांनी एका रुग्णाला सोडून यायचे आहे, येणार का, अशी विचारणा केली. इथून लांब नेऊन सोड, पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला नाही पाहिजे अशा ठिकाणी सोडायचे, असेही सांगितले. काही वेळाने दोन्ही पाय नसलेला, हातात सुई व जखमी अवस्थेत असलेला रुग्ण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रिक्षात ठेवला. त्या रुग्णाला विश्रांतवाडी येथील एका वडाच्या झाडाजवळ सोडून डॉक्टर आणि कर्मचारी निघून गेले.
रितेश गायकवाड यांनी याप्रकारची माहिती पोलिसांना दिली. त्या माहितीच्या आधारे रात्री उशिरा येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दादासाहेब गायकवाड यांच्या मदतीने पोलिसांनी त्या रुग्णाला पुन्हा ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ससून रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून बेवारस रुग्णांसोबत गैरप्रकार सुरु असल्याने त्याची चौकशी सरकारने करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली. याप्रकरणी दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले.
No comments:
Post a Comment