अंधेरीत बर्फीवाला आणि गोखले पूल दरम्यानचा मार्ग खुला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 July 2024

अंधेरीत बर्फीवाला आणि गोखले पूल दरम्यानचा मार्ग खुला


मुंबई - अंधेरी पूर्व व पश्चिम प्रवासासाठी सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा (Barfiwala Bridge) भाग गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या (Gokhale Bridge) समांतर उंचीवर जोडल्यानंतर, वाहतूक व्यवस्थापनाची संबंधित कामे व चाचण्या पूर्ण होवून आज गुरूवार, दिनांक ४ जुलै २०२४ सायंकाळी ५ वाजेपासून जुहू दिशेने अंधेरी असा प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्‍यात आली आहे. सध्‍या हलक्या वाहनांनाच पुलावर प्रवेश दिला जाणार असून अवजड वाहनांना वाहतुकीस मनाई करण्‍यात आली आहे. (Mumbai News) 

अंधेरी परिसराला पूर्व आणि पश्चिम जोडणारा, वाहतुकीसाठी महत्वाचा दुवा असलेल्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या उंचीशी समांतर अशा पातळीवर सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल जोडणीच्या दृष्टीने नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे निर्देश बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार तांत्रिक सल्लागारांच्या देखरेखीखाली सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्यात आली आहेत. या अंतर्गत सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग एका बाजुला १,३९७ मिलीमीटर आणि दुस-या बाजुला ६५० मिलीमीटरवर उचलण्यात आला आहे. या जोडणीसाठी गत दोन महिन्‍यांपासून अथक कामे सुरू होती. हे आव्‍हानात्‍मक काम दिवस रात्र सुरू ठेवून ७८ दिवसात पूर्ण झाले आहे. पुलावर वाहतूक सुरू होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती संरचनात्मक कामे, वाहतूक व्यवस्थापनाची अनुषांगिक कामे, इतर चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. मार्गिका खुली केल्यानंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी आज सायंकाळी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली.

सी. डी. बर्फीवाला पुलाची पातळी उचलण्याची कार्यपद्धती व सर्वसाधारण आराखडा हा वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय) तसेच, भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी) यांच्‍याद्वारे आरेखित करण्‍यात आला होता. तर, पूल जोडणी कार्यपद्धती वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय) यांचेद्वारे निश्चित करण्‍यात आली होती. भारतीय तंत्रज्ञान संस्था (मुंबई) यांनी या कार्यपद्धतीची पडताळणी करुन त्यात काही सुधारणा सुचवल्या. सुधारित कार्यपद्धतीची अंमलबजावणी ही बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था यांच्या निरीक्षणाखाली करण्यात आली.  या पुलावर जुहू पासून अंधेरी असा पश्चिम - पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरळीत आणि संरचनात्मकदृष्ट्या सुरक्षित (स्‍ट्रक्‍चरली सेफ) असल्‍याचे 'व्हिजेटीआय' मार्फत घोषित करण्‍यात आले आहे. पुलाच्‍या मार्गिकेवरील वाहतूक सुरू करण्‍याच्‍या दृष्‍टीने वाहतूक व्‍यवस्‍थापना संबंधित अनुषांगिक कामे व चाचण्‍या वाहतूक पोलिसांच्या सुचनेनुसार पूर्ण करण्‍यात आल्‍या आहेत. त्‍यानुसार, आज (दिनांक ४ जुलै २०२४) सायंकाळी ५ वाजेपासून पश्चिम - पूर्व मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्‍यात आली आहे.
 
गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या दुसऱया टप्प्यातील काम सध्या रेल्वे भागातील हद्दीत सुरू आहे. त्यामुळे सी. डी. बर्फीवाला आणि गोखले पुलावर फक्त हलक्या वाहनांना प्रवेशासाठी मुभा देण्यात आली आहे. तर अवजड वाहनांसाठी उंची रोधक (हाईट बॅरिअर) बसविण्यात आले आहेत. दुसऱया टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. जुहू पासून अंधेरी असा  पश्चिम - पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाल्यानंतर हलक्या वाहनांच्या सोयीसाठी वाहतुकीचे नियोजन हे मुंबई वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. परिणामी वाहतूक कोंडी कमी होतानाच इंधन व वेळेच्‍या बचतीसह वायू प्रदूषण कमी होण्‍यास मदत होणार आहे. मुख्य पुलाच्या दक्षिण भागातील काम जलद गतीने सुरु आहे. हे काम पूर्ण करताना सी. डी. बर्फीवाला पुलास दक्षिण मार्गिका जोडली जाईल, याची दक्षता घेतली जात आहे. परिणामी, या भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad