बेलापूरमध्ये इमारत कोसळून ३ जणांचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेलापूरमध्ये इमारत कोसळून ३ जणांचा मृत्यू

Share This


नवी मुंबई - नवी मुंबईतील बेलापूर सेक्टर १९ येथील तीन मजली इमारत आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कोसळली. इंदिरा निवास असे या इमारतीचे नाव असून या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरु आहे. ही इमारत अनधिकृत बांधण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. आपत्तीग्रस्तांना सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

इंदिरा निवासमध्ये एकूण १३ सदनिका होत्या. त्यात २६ कुटुंब राहत होती. ही इमारत कमकुवत होती. इमारतीमधील रहिवासी साखर झोपेत असताना इमारत कोसळली. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच एनडीआरएफ, पोलीस, अग्निशमन दल आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून दोन व्यक्तींचा मृतदेह बाहेर काढण्यात आले. एनडीआरएफच्या जवानांना दुसरा मृतदेह काढण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागले. ढिगाऱ्याखाली आणखी एक मृतदेह आहे. या मृतदेहाला बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. या घटनेत अजून एक जण बेपत्ता आहे. त्या व्यक्तीचा शोध अद्याप लागलेला नाही.

सकाळी जवळपास ५ वाजून ३० मिनिटांनी इमारत जमीनदोस्त झाली. ही तळ मजल्यासह तीन मजली इमारत आहे. या इमारतीतून ३७ प्रौढ आणि १३ मुले असे ५० जण सुरक्षित बाहेर आली. अँम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली असून बचाव कार्य सुरु आहे. ही इमारत महापालिका यादीतील अनधिकृत बांधकाम केलेली इमारत आहे. महापालिका अतिक्रमण विभागाने या इमारतीला नोटीस बजावून रिकामी करण्याच्या सूचना जूनमध्ये देण्यात आल्या होत्या. मात्र रहिवाशांनी इमारत खाली केली नाही. अखेर आज पहाटे ही अनधिकृत इमारत पडली. बाहेर काढलेल्यांसाठी निवाऱ्याची व खाण्याची व्यवस्था महापालिका निवारा केंद्रात करण्यात आली. इमारत का आणि कोणत्या कारणांमुळे कोसळली याचा तपास करण्यात येणार असल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांनी दिली.

आवश्यक सहाय्य तातडीने करा -
दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली. इमारत दुर्घटनेत सापडलेल्या आपत्तीग्रस्तांना तातडीचे उपचार, आरोग्य सुविधा, अन्नपाणी, कपडे, तात्पुरता निवारा आदी आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात. महापालिका आणि इतर सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी या आपत्तीग्रस्तांना आवश्यक ते सहाय्य तातडीने उपलब्ध करावे, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या. तर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages