रत्नागिरी - कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोकणातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी आजूबाजूच्या गावांत शिरले आहे. खेडमधील जगबुडी नदीला पूर आला असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नारंगी नदीलाही पूर आल्याने खेड-दापोली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सध्या जगबुडी नदी ९ मीटर पातळीच्या खालून वाहत असली तरी पावसाचा जोर असल्याने खेड शहरावर पुराची टांगती तलवार आहे. चिपळूणमध्ये वाशिष्टी नदीलाही पूर आला आहे. वाशिष्टी आणि शिव नदी इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत.
रायगड जिल्ह्यातही रोहा येथील कुंडलिका नदी दुथडी भरून वाहात आहे. या नदीचा पूर इशारा पातळीच्या बाहेर गेल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही खेड आणि राजापूरची अर्जुना व कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. काजळी नदीला पूर आल्याने रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई बाजारपेठेतल्या काही दुकानांत पाणी शिरले आहे. राजापूर, खेड, चिपळूण, संगमेश्वरमधील बाजारपेठाही पाण्याखाली गेले आहेत.
प्रशासनाला सतर्कतेचे आदेश -
राज्यात ब-याच भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, राज्यातील सर्व महापालिका आयुक्त आणि आप्तकालीन यंत्रणांच्या प्रमुखांशी चर्चा करून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलिस, महापालिका, नगरपालिका आदी विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सतर्क राहावे आणि नागरिकांना मदत करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
No comments:
Post a Comment