नागपूर - विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून उपराजधानी नागपूरसह पूर्व विदर्भाला अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. धुव्वॉंधार पावसाने सर्वत्र दाणादाण उडाली आहे. अतिवृष्टीसदृश पावसामुळे पूर्व विदर्भातील जनजीवन विस्कळीत झाले असून शहरांतील रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरूप आले आहे. अजूनही काही भागांत पाऊस जोरदार कोसळत आहे. गडचिरोली जिल्ह्यात पार्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड तालुक्यातील १०० हून अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. भामरागडही अक्षरक्ष: जलमय झाले आहे. पुरामुळे ४ मुख्य महामार्ग आणि २६ छोटे मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.
गोसेखुर्द धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने नदीला पूर आला आहे. तसेच गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी आणि देवरी या तीन तालुक्यांना पावसाचा फटका बसला आहे. नदी, नाल्यांना पूर आल्याने अनेक घरांत पाणी शिरले आहे. यवतमाळ जिल्ह्यातही नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. कोसारा गावाजवळ वाहणा-या वर्धा नदीला पूर आला आहे. त्यामुळे कोसरा ते सोईट वाहतूक बंद करण्यात आली. तसेच वणी तालुक्यात आलेल्या पुरामुळे शेलू खुर्द मार्ग आणि शिवणी ते चिंचोली मार्ग बंद झाला. जिल्ह्यात २४ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून, १ हजार २१० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात तलाव फुटला -
चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर-मूल मार्गावरील चिचपल्ली येथील गावतलाव फुटल्याने गावातील अंदाजे १०० ते १५० घरांत पाणी शिरले आहे. त्यामुळे घरातील धान्यासह संसारोपयोगी साहित्य, शेतीसाठी घरात आणून ठेवलेले खत आणि बी-बियाणे पाण्यात भिजले. तसेच पुरात १०० बक-या आणि इतर जनावरे दगावली. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी हानी झाली आहे. पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात शाळांना सुटी देण्यात आली.
No comments:
Post a Comment