मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ जलाशयांपैकी 'हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय' आज (४ ऑगस्ट २०२४) पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी पूर्ण भरले आहे. ज्यानंतर तलावाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून ७०६.३० क्युसेक या दराने जल विसर्ग सुरू आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. (Madhya Vaitrana Dam overflow)
गेल्याच महिन्यात तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा हे तलाव ओसंडून वाहू लागल्यानंतर त्यापाठोपाठ आज 'हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय' देखील पूर्ण भरले आहे. यानुसार यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी ५ तलाव आतापर्यंत पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.
आज मध्यरात्र भरलेल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयाची कमाल पाणी साठवण क्षमता ही १९३,५३० दशलक्ष लिटर (१९,३५३ कोटी लीटर) इतकी आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात १०२.४ मीटर उंचीचे आणि ५६५ मीटर लांबीचे मध्य वैतरणा धरण सन २०१४ मध्ये पूर्ण केले. हे धरण महानगरपालिकेने विक्रमी वेळेत बांधून पूर्ण केले होते. या धरणाचे नामकरण 'हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय' असे करण्यात आले आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. आज पहाटे ६ वाजताच्या मोजणीनुसार सर्व ७ तलावांमध्ये मिळून ८९.१० टक्के इतका जलसाठा आहे.
No comments:
Post a Comment