पुणे - पीएचडीसाठी नाेंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के दराने अधिछात्रवृत्ती मिळावी यासाठी संशाेधक विद्यार्थ्यांचे आंदोलन दहाव्या दिवशीही सुरूच आहे. संशाेधक विद्यार्थ्यांना संशाेधन करण्यासाठी सन्मानाने फेलाेशिप दिली पाहिजे मात्र, त्यांना रस्त्यावर उतरून आंदाेलनात वेळ द्यावा लागत आहे. वेळाेवेळी आंदाेलन करूनही राज्य शासनाकडून लक्ष दिले जात नसल्याने बुधवारी बार्टी कार्यालयाच्या प्रवेशव्दारासमाेर आंदाेलक विद्यार्थ्यांनी शर्ट काढून अर्धनग्न हाेत आंदाेलन केले तसेच मुंडन करून निषेध व्यक्त केला.
राज्य शासनाने बार्टीसह, सारथी आणि महाज्याेती संस्थांकडे नाेंदणी केलेल्या पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरसकट पन्नास टक्के दराने फेलाेशिप जाहीर केली. मात्र, बार्टीच्या विद्यार्थ्यांनी त्यास विराेध करीत शंभर टक्के दराने फेलोशिप मिळावी या मागणीसाठी दि. ५ ऑगस्ट पासून आंदाेलनास सुरूवात केली आहे. काही विद्यार्थी उपाेषण करीत आहेत. मात्र, अद्याप राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेतली नाही त्याच्या निषेधार्ह विद्यार्थ्यांनी अर्धनग्न हाेत मुंडन करीत निषेध केला.
राज्यातील इतर जिल्ह्यांतून आलेले आंदाेलक विद्यार्थी उघड्यावर राहत आहेत. त्यातील अनेकांची तब्येत ढासळलेली आहे. राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा ताे पर्यंत बार्टी कार्यालयासमोर आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. बार्टीकडे नाेंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना पीएच.डी नोंदणी दिनांकांपासून सरसकट शंभर टक्के दराने फेलोशिप मंजूर केल्याशिवाय उपोषण थांबविणार नसल्याचे हर्षवर्धन दवणे आणि पल्लवी गायकवाड या विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. आंदोलकांना काँग्रेससह, वंचित बहुजन आघाडी, दलित पॅंथर, आरपीआय, एसपीपीयू विद्यार्थी कृती संघर्ष समिती यासह विविध संस्था, संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
No comments:
Post a Comment