मुंबई - डिसेंबर २०२३ मध्ये सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केले होते. हा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यावर सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातदेखील पैसे खाल्ले यासारखे दुर्दैव नाही, अशा शब्दांत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या भ्रष्ट कारभारावर खरमरीत टीका केली.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे नौदलदिन साजरा करण्यात आला होता. त्या वेळी मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान मोदी यांनी ४ डिसेंबर २०२३ रोजी मालवणमध्ये पुतळ्याचे लोकार्पण केले होते; परंतु केवळ ८ महिन्यांत हा पुतळा कोसळला आहे. पुतळा नेमका कशामुळे कोसळला, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी निकृष्ट कामामुळेच पुतळा कोसळल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील सरकारच्या कारभारावर टीका केली आहे तसेच संभाजीराजे म्हणाले, हा पुतळा खूप घाईगडबडीत उभा केला होता तसेच हा पुतळा आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून बनवला नव्हता त्यामुळे आम्ही हा पुतळा बदलण्याची मागणी केली होती मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले. संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारला या संदर्भात पत्र पाठवले होते. या पत्राचा फोटोदेखील संभाजीराजे यांनी समाज माध्यमांवर शेअर केला आहे.
संभाजीराजे यांनी एक्सवरील संदेशात, पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाईगडबडीत उभारलेला पुतळा कोसळला! मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब दुसरी कोणतीही नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार? आता त्या ठिकाणी पुन:श्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे; पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्ष्येत परत काही गडबड करू नये. उशीर होऊ दे; पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे, असे म्हटले आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रखर टीका केली. पंतप्रधान मोदी ज्या कार्यक्रमाला उपस्थित होते तो पुतळा कोसळला आहे. ८ महिन्यांत छत्रपतींच्या पुतळ्याची ही अवस्था झाली आहे. यासारखे दुर्दैव नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना प्रमाण मानून वाटचाल करणारे हे सरकार नाहीच, हे आता सिद्ध झाले आहे. राज्यातील महायुती सरकार हे महाविनाशी सरकार आहे. हे आम्ही का म्हणतोय, हे आज महाराष्ट्रातील जनतेला दिसत आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा दिमाखात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा. महाराजांची अवहेलना करणा-या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे. संबंधित कंत्राटदाराची सुरू असलेली सर्व कामे तातडीने काढून घ्यावीत. महाराजांची अवहेलना करणा-यांना शिक्षा व्हावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळा उभारायचा हेच सरकारचे ध्येय होते. त्यांना कामाच्या दर्जाचं घेणं-देणं नाही. कमिशन घेणं आणि कंत्राट वाटणे एवढंच काम सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर केली. ही घटना अत्यंत गंभीर आहे. महाराजांचा पुतळा बसवताना काळजी घेतली नाही. केवळ पंतप्रधान यांच्या हस्ते पुतळा उभारायचा हेच त्यांचे ध्येय होते. हे इव्हेंट सरकार आहे. त्यांना कामाच्या दर्जाचं घेणं-देणं नाही. कमिशन घेणं आणि कंत्राट वाटणे एवढंच काम सुरू आहे. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतही हेच झाले आहे. महाराजांचे नाव वापरायचे; पण काळजी घ्यायची नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार!
राज्यातील महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. निकृष्ट कामे आणि भ्रष्टाचार कुठे कुठे कराल? किमान छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तरी सोडायचा होता. कमिशनखोरीसाठी भाजपा सरकारने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनाही सोडले नाही. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे निकृष्ट बांधकाम करून भाजपा सरकारने महाराष्ट्राची अस्मिता धुळीस मिळवली आहे, असा हल्लाबोल प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील पुर्णाकृती पुतळा फक्त ८ महिन्यांत कोसळणे ही महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच्या मनाला वेदना देणारी घटना आहे. मिंधे सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करून निव्वळ इव्हेंटबाजी केली; पण कामाच्या निकृष्ट दर्जाचे काय? कामात झालेल्या भ्रष्टाचाराचे काय? संसद, राम मंदिर, अटल सेतू यासारखे निकृष्ट कामांचे अनेक नमुने देशाने पाहिले; पण महाराष्ट्रातल्या जनतेला आपली अस्मिता अवघ्या ८ महिन्यांत कोसळताना बघावे लागेल, असे वाटले नव्हते.
काम सुरू असतानाच स्थानिक लोकांनी या पुतळ्याच्या कामासंदर्भात केलेल्या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही? हा शिवकालीन किल्ला आजही मजबूत आहे. मग ८ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळला याचा अर्थ काय? छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार करणा-यांना महाराष्ट्राची जनता कधीच माफ करणार नाही. शिवप्रेमी म्हणून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. या घटनेची गंभीर दखल घेऊन सरकारने तातडीने चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी लोंढे यांनी केली.
No comments:
Post a Comment