मुंबई - मुंबईत विविध ठिकाणी लावण्यात आलेले मात्र परवानगीची मुदत संपलेले तसेच अनधिकृतपणे लावलेले बॅनर, फलक आणि अन्य प्रदर्शित साहित्य निष्कासित करण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अनुज्ञापन खात्याकडून निरंतर सुरू आहे. दिनांक १८ सप्टेंबर ते दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजेदरम्यानच्या २४ तासांच्या कालावधीत मुंबईतील विविध ठिकाणचे एकूण ८ हजार २४४ बॅनर, फलक आणि इतर प्रदर्शित साहित्य काढून टाकण्यात आले आहेत.
श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये विविध ठिकाणी बॅनर, फलक आणि इतर प्रदर्शित साहित्य लावण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने परवानगी देण्यात आली होती. या परवानगीची मुदत श्री गणेश मूर्ती विसर्जनानंतर म्हणजेच अनंत चतुर्दशीनंतर संपुष्टात आली. त्यामुळे, मुंबई महानगरातील विविध रस्ते, चौक आदी परिसरांमध्ये परवानगी संपुष्टात आलेले तसेच अनधिकृतरित्या लावलेले बॅनर, फलक आणि अन्य प्रदर्शित साहित्य हटवण्याची मोहीम महानगरपालिकेच्या अनुज्ञापन खात्याच्या वतीने हाती घेण्यात आली आहे.
या मोहीम अंतर्गत दिनांक १८ सप्टेंबर २०२४ ते दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजेदरम्यानच्या कालावधीत मुंबईतील एकूण ८ हजार २४४ इतके साहित्य हटवण्याची कार्यवाही करण्यात आली. यामध्ये धार्मिक स्वरूपाचे ४ हजार ११५ बॅनर, २ हजार ००६ फलक (बोर्ड) आणि ५५५ पोस्टर्स; राजकीय स्वरूपाचे ३५६ बॅनर, २६३ फलक (बोर्ड), ४८ पोस्टर्स; व्यावसायिक स्वरूपाचे १९६ बॅनर, २० फलक (बोर्ड), ६ पोस्टर्स तसेच ६७९ झेंड्यांचा समावेश आहे. दरम्यान, अनधिकृत जाहिरात फलक, पोस्टर्स, बॅनर तसेच अन्य प्रदर्शित साहित्य हटवण्याची कार्यवाही यापुढेही निरंतरपणे सुरू राहील, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment