जळगाव - महाराष्ट्रातील आदिवासी समाज जो गडचिरोलीपासून सिंधुदुर्ग ते पालघरपासून नांदेडच्या टोकापर्यंत आहे, तो वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. त्याला एकत्रित करण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीने केला. आनंदाची बाब अशी की, यातील वेगवेगळ्या संघटना आणि राजकीय पक्षांनी एकत्रित राहण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची पहिली सभा आपण चोपडा येथे घेत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे आदिवासी सत्ता संपादन हक्क परिषदेत सांगितले.
विदर्भात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, अमरावती, बुलढाणा, जळगाव-जामोद, तेल्हारा या भागात 22 टक्के आदिवासी समाज राहतो, तरी सुद्धा राजकीय पक्ष आदिवासींना राजकीय प्रतिनिधीत्व द्यायला तयार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आदिवासी आरक्षित मतदारसंघात तर आम्ही लढणार, पण ज्या मतदारसंघात आदिवासींची लोकसंख्या आहे त्या जागा सुद्धा महाराष्ट्रात आदिवासी पहिल्यांदा लढणार असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी नमूद केले.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्राचे राजकारण हे पैशाचे राजकारण झाले आहे. भाजप, काँगेस, शिवसेना, राष्ट्रवादी, उमेदवारी द्यायचे असेल तर बोली बोलावी लागते, राजकारणात कार्यकर्त्यांचे कर्तुत्व बघितले जात नाही तर किती पैसे खर्च करणार हे विचारले जाते जो उमेदवार जास्त खर्च करेल त्याला उमेदवारी दिली जाते. आम्ही संविधान वाचवतो असा काँग्रेसने नारा दिला. त्यामुळे काँग्रेसला, शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला लोकांनी मतदान केले आणि आज त्यांची भूमिका ही आरक्षण काढून घेण्याची आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा SC-ST आरक्षणात क्रिमीलेयर लागू करण्याचे काम करत आहे. एका कुटुंबाने एकदा आरक्षणाचा लाभ घेतला की यापुढे आरक्षण मिळणार नाही. म्हणजेच आरक्षणातून बाद होईल. हा निर्णय भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, शिवसेना (उबाठा) लागू करणार आहे असे म्हणत आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर हल्ला चढवला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवार यांच्यावर ही ॲड. आंबेडकरांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, जरांगे पाटील यांची मागणी आहे की, ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, यावर शरद पवारांनी विधान केले की, राष्ट्रवादीचा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे, त्यामुळे शरद पवार हे सर्वांचे नेते राहिलेले नाहीत तर ते मराठा समाजाचे नेते आहेत.
ओबीसी आरक्षणात मराठा समाज आरक्षणाचे ताट वेगळे असले पाहिजे अशी वंचितची भूमिका आहे. सरकारला मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यायला कोणी थांबवले आहे, पण यांना गरीब मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही तर यांना भांडणे लावायची आहेत असे म्हणत त्यांनी राज्य सरकारचाही समाचार घेतला.
जरांगेंचे आंदोलन आणि ओबीसी आरक्षण संपवण्याचे काम थांबले नाही -
जरांगे पाटील यांचे आंदोलन शमलेले नाही. ओबीसी आरक्षण संपवण्याचे कामही थांबले नाही. ते विधानसभा निवडणुकीच्या नंतर पुन्हा सुरू होणार असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.
ओबीसींचे आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने कोणी थांबवले आहे ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, शहरात आणि ग्रामीण भागात किती ओबीसी राहतात याची माहिती नाही, डेटा नाही हा डेटा जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत आरक्षण लागू करायचं नाही आणि त्यामुळे ओबीसी आरक्षण थांबवलेले आहे.
No comments:
Post a Comment