सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 September 2024

सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो - मुख्यमंत्री


मुंबई - "देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करून एक चळवळ उभी केली. त्याचे फलित म्हणजे आज देशभरात हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. स्वच्छता हा आरोग्याचा मंत्र असून मुंबईमध्ये डीप क्लिन ड्राईव्हच्या माध्यमातून रस्ते साफ करणे, रस्ते झाडणे, पाण्याने रस्ते धुणे हे काम सुरू आहे. यामुळे मुंबईचे प्रदुषण खूप कमी झाले आहे. याकामी सफाई कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो आहे", असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदे यांनी काढले.

'स्वच्छता ही सेवा २०२४ (SHS)' या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ आज मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंग्री मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के.एच.गोविंदराज, मुंबई जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्‍त अश्विनी भिडे, सेना दलाचे अधिकारी, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, सफाई कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभारंभ केलेले हे राज्यस्तरीय अभियान महात्मा गांधी जयंती म्हणजे २ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून राज्यातील नागरी व ग्रामीण भागात ‘स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या स्वच्छता पंधरवडा मोहिमेकरिता सर्वांची भागीदारी असायली हवी, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. ते म्हणाले की, स्वच्छता ही सेवा अभियानाच्या उपक्रमाद्वारे आर.आर.आर. (रेड्युस, रियुज, रिसायकल) केंद्र उभारून पर्यटन स्थळावर शुन्य कचरा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांअंतर्गत वृक्षारोपन आणि सौंदयीकरण करण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर नियमित स्वच्छ न होणारी ठिकाणे शोधण्यात आली असून अशी ठिकाणे कायमस्वरूपी स्वच्छ राहील याकरिता त्रिसुत्री नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही. स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्राचा देशात पहिला नंबर लागला आहे. या स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबई महानगरपालिकेने दीड लाख झाडे पावसाळ्यात लावली आहे. या अभियानामध्ये ९३५९ कार्यक्रमाची नोंदणी झाली असून सीटीयू (क्लिनलीनेस टार्गेट युनिट) अंतर्गत ४५२० ठिकाणे शोधली असून या ठिकाणचा कचरा उचलला जाणार आहे. याकरिता जनसहभागाचे ४१११  कार्यक्रम राबविले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते या अभियानांचा शुभारंभ झाल्यानंतर गिरगाव चौपाटी येथे मुख्यमंत्र्यांनी स्वत: स्वच्छतेची सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर चालवून मशीनद्वारे कचरा संकलन केले. त्याचबरोबर ‘करूया वाईट विचार नष्ट, स्वच्छ करूया आपला महाराष्ट्र’ असा संदेशही फलकावर लिहून स्वाक्षरीत केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad