जगाला युद्ध नको बुद्ध हवाय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जगाला युद्ध नको बुद्ध हवाय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Share This

मुंबई - जगात आज अनेक ठिकाणी संघर्ष आणि युद्धाची परिस्थिती असताना जगाला युद्ध नको बुद्ध हवाय, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षावर आज पहिल्यांदाच वर्षावास या पवित्र महिन्यानिमित्त भंतेजींसाठी चिवरदान, धम्मदान व भोजनदान सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. 

ते पुढे म्हणाले की, भिक्षू महासंघांच्या राज्यभरातून आलेल्या भंतेजींच्या उपस्थितीने आज वर्षावर प्रेमाचा आणि आशिर्वादाचा वर्षाव झाला आहे. गेली दोन वर्ष मुख्यमंत्री नव्हे तर कॉमन मॅन म्हणूनच जनसेवा करत आलोय, असे मुख्यमंत्री म्हणाले. अनेक ठिकाणी संघर्षाची परिस्थिती असली तरी जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे. हे आपण आचरणात आणले तर समाज, राज्य आणि देश सुखी झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आज ज्ञान जरी खूप असले तरी बुद्धाचे तत्वज्ञान देखील तितकेच आवश्यक आहे, असे ते म्हणाले. दौलत मिली किसको तो धनवान बन गया, ताकद मिली किसको तो पहलवान बन गया, बाबासाहेब मिले मुझको तो इन्सान बन गया, अशी रचना सादर करत त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती   आदर व्यक्त केला. राज्याचा कारभार तथागत गौतम बुद्ध यांची शिकवण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 
 
या सोहळ्याची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादानाने आणि सामूहिक प्रार्थनेने झाली. यावेळी उपस्थितीत आदरणीय भंतेजींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते चीवरदान, वस्त्रदान करण्यात आले. भंतेजींनी मुख्यमंत्री आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना धम्म आशिर्वाद दिले. यानंतर भंतेजींसाठी भोजनदानाचा सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, प्रवक्ते राहुल लोंढे, डॉ. राजु वाघमारे, अनिल गायकवाड  उपस्थित होते. 

ऑल इंडिया भिक्षू महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्ता महाथेरो म्हणाले की तथागत भगवान गौतम बुध्दाच्या काळात प्रसेनजित नावाचा राजा होता तोसुद्धा अशाच प्रकारे भोजनदान, धम्मदान करत होता. त्याची आज आठवण आम्हाला आली, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्र्याच्या शासकीय निवासस्थानी असा हा भोजनदानाचा कार्यक्रम झाला याची इतिहासात नोंद होईल, असे गौरवोद्गार महाथेरो यांनी काढले. 
वर्षावर प्रथमच अशा प्रकारचा सोहळा आयोजित केल्याबद्दल भंतेजींनी आनंद व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages