मुंबई - दादर प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर समोर रस्त्यावर आज सकाळी खड्डा पडला. जलवाहिनीला गळती लागल्याने हा खड्डा पडला होता. पालिकेकडून जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याकारणाने उद्या १३ सप्टेंबरला करिरोड, लोअर परेल आदी परिसरात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
आज सकाळी वीर सावरकर मार्ग व न्यू प्रभादेवी रोडच्या जंक्शनला रस्ता खचल्याचे आढळून आले. तातडीने सदर ठिकाणी जी दक्षिण विभागातील परिरक्षण विभाग, जलकामे विभाग व इतर विभागांनी स्थळ निरीक्षण केले व सदर खड्याच्या बाजूने बॅरिकेडिंग करण्यात आले. स्थळ निरीक्षणा दरम्यान असे आढळून आले की, ६६ इंचाच्या जलवाहिनी मधून पाणी गळती होत आहे.सदर पाणी गळती थांबवण्यासाठी सहाय्यक अभियंता (परिरक्षण) जलकामे शहर १ यांनी दुपारी गळती थांबवण्याचे काम हाती घेतले. काम हाती घेतल्यानंतर व खड्डा वाढविल्यानंतर असे दिसून आले की, जलवाहिनीच्या खालच्या भागातून पाणी गळती होत आहे.
सदर जलवाहीनीवरून प्रभादेवी, आदर्श नगर, साई सुंदर नगर, जनता कॉलनी व आजूबाजूचा परिसर या ठिकाणी दुपारी ३:३० ते संध्याकाळी ७ पाणीपुरवठा करण्यात येतो. सदर पाणीपुरवठा गळती दुरुस्ती करण्यासाठी संध्याकाळी ५ वाजता बंद करण्यात आला. ही पाणी गळती थांबवण्यासाठी जलवाहिनीच्या दोन्ही बाजूला खड्डा घेऊन पाणी गळती थांबण्याचे योजिले होते, परंतु सदर गळती मोठ्या प्रमाणात असल्याने हे शक्य झाले नाही.
सदर जलवाहिनीवर मॅनहोल तयार करून जलवाहीनीच्या आत जाऊन पाणी गळती थांबवणे गरजेचे आहे, त्यामुळे सदर कामास जास्त वेळ लागणार आहे. सदर कामामुळे जी दक्षिण विभागातील १३.०९.२०२४ रोजी पहाटे ०४:३० ते सकाळी ०७:४५ या काळात ना. म. जोशी मार्ग, सखाराम बाळा पवार मार्ग, करी रोड परिसर व लोअर परेल परिसर या विभागातील पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे महापालिकेचे सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. सदर विभागातील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment