मुंबई - विधानसभेच्या निवडणुकीसाठी (Maharashtra Elections) निवडणूक आयोगामार्फत (Election Commision) राज्यभरात १ लाख ४२७ मतदान केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, या दृष्टीकोनातून राज्यात मतदान केंद्रांचे (Voting Center) सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यात ८ हजार ४६२ मतदान केंद्र आहेत. त्यानंतर मुंबई उपनगर येथे ७ हजार ५७९, ठाणे - ६ हजार ९५५, नाशिक – ४ हजार ९२२ तर नागपूर येथे ४ हजार ६३१ मतदान केंद्र आहेत.
निवडणूक आयोगाने शहरी भागातील मतदाराची अनास्था विचारात घेऊन गृहनिर्माण संकुलात मतदान केंद्र उभारली आहेत तसेच ग्रामीण आणि आदिवासी भागातील मतदारांना मतदान केंद्राच्या जवळ लवकरात लवकर पोहोचावे यासाठी मतदान केंद्राची संख्या वाढवली आहे.
महाराष्ट्रातील २४१ विधानसभा मतदारसंघात मुख्य आणि सहायक मतदान केंद्रांची संख्या निश्चित केली आहे. यंदा राज्यात मुख्य मतदान केंद्र ही १ लाख १८६ असून त्यापैकी शहरी भागात ४२ हजार ६०४ तर ग्रामीण भागात ५७ हजार ५८२ इतकी मतदान केंद्र संख्या राहणार आहे. सहायक मतदान केंद्रांची संख्या २४१ इतकी आहेत. गेल्या काही निवडणुकांच्या तुलनेत मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे मतदारांची सोय आणि मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित होईल. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रात पोहोचता यावे यासाठी बऱ्याच ठिकाणी आवश्यक रॅम्पची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे.
आदिवासी आणि दुर्गम क्षेत्रावर विशेष लक्ष -
यंदाच्या निवडणुकीत आदिवासी मतदारसंघ आणि दुर्गम भागांतील मतदारांसाठी विशेष सुविधा देण्यावर भर दिला आहे. गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार, धुळे, आणि अमरावती जिल्ह्यात जेथे आदिवासी आणि दुर्गम भाग आहेत तेथे मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने मतदार सुविधांमध्ये सुधारणा केली आहे, जसे की मतदार सहाय्य केंद्रे, मतदार हेल्पलाईन, आणि सूचना फलक यांचा समावेश आहे. तरुण मतदार, महिला मतदारांना लक्षात ठेवून हे उपाय योजले आहे.
सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्येही मतदान केंद्र -
शहरी भागांमध्ये जसे की मुंबई, पुणे, ठाणे सारख्या शहरामध्ये अतिउंच इमारती आणि सहकारी गृहनिर्माण संस्थामध्ये १ हजार १८१ मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहे. तसेच झोपडपट्टीमध्ये २१० मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहे.
नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता -
निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेला अधिक सुलभ आणि पारदर्शक बनवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मतदार आपले मतदान केंद्र शोधण्यासाठी ऑनलाइन पोर्टल आणि मोबाइल ॲप्स वापरू शकतात. मतदार जागरूकता मोहिमेंतर्गत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मतदारांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातील.
– जिल्हानिहाय मतदान केंद्रांची संख्या
१. पुणे - ८४६२
२. मुंबई उपनगर - ७५७९
३. ठाणे - ६९५५
४. नाशिक - ४९२२
५. नागपूर – ४६३१
६. अहमदनगर - ३७६५
७. सोलापूर - ३७३८
८. जळगाव - ३६८३
९. कोल्हापूर - ३४५२
१०. औरंगाबाद – ३२७३
११. सातारा - ३१६५
१२. नांदेड – ३०८८
१३. रायगड – २८२०
१४. अमरावती – २७०८
१५. यवतमाळ - २५७८
१६. मुंबई शहर - २५३८
१७. सांगली – २४८२
१८. बीड – २४१६
१९. बुलढाणा – २२८८
२०. पालघर – २२७८
२१. लातूर - २१४३
२२. चंद्रपूर - २०७७
२३. अकोला – १७४१
२४. रत्नागिरी – १७४७
२५. जालना – १७५५
२६. धुळे – १७५३
२७. परभणी – १६२३
२८. उस्मानाबाद - १५२३
२९. नंदूरबार – १४३४
३०. वर्धा – १३४२
३१. गोंदिया – १२८५
३२. भंडारा - ११६७
३३. वाशिम – ११००
३४. हिंगोली - १०२३
३५. गडचिरोली - ९७२
३६. सिंधुदुर्ग – ९२१
एकूण : १,००,४२७ मतदान केंद्र
No comments:
Post a Comment