मुंबईच्या विकासातील स्पीडब्रेकर काढले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईच्या विकासातील स्पीडब्रेकर काढले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Share This


मुंबई - कोस्टल रोड, आरे कारशेड, मेट्रो ३, अटल सेतू, महालक्ष्मी रेसकोर्समधील पार्क अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये टाकलेले स्पीडब्रेकर आम्ही काढून टाकले अन्यथा १५ वर्ष हे प्रकल्प पूर्ण झाले नसते, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उबाठावर केली. महायुतीचे उमेदवार मिलिंद देवरा (Milind Devra) यांच्या वरळीमधील निवडणूक कार्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, मिलिंद देवरा यांनी यापूर्वी दोनवेळा लोकसभेत वरळीकरांचे प्रतिनिधीत्व केले होते. गेल्या वर्षात वरळीकरांना जो न्याय मिळायला हवा होता तो दुर्देवाने मिळाला नाही. त्यामुळे खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली. देवरा मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करतील, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

वरळीतील स्पॅन वायडनिंगचा प्रश्न सोडवण्यास आधीच्या सरकारने असमर्थता दाखवली होती. मात्र मुख्यमंत्री झाल्याबरोबर हा प्रश्न तातडीने सोडवला, असे शिंदे म्हणाले. प्रेम नगर, सिद्धार्थ नगर, बी.डी.डी चाळ, पोलीस वसाहती वरळी कोळीवाडामधील रखडलेले प्रकल्प, धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडवण्याचे काम सरकारने केले. मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी ७ एजन्सी एकत्रपणे काम करत आहेत. रमाबाई नगरमधील १७ हजार भाडेकरुंना घरे देणार आहोत. मुंबईबाहेर फेकलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्याचे काम आपले सरकार करेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार ही एकच टेप रेकॉर्ड काहीजण लावतात. मात्र आता ही रेकॉर्ड चालणार नाही, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर, फिनटेक कॅपिटल आणि पॉवरहाऊस बनवण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले आहे. डबल इंजिनचे सरकार म्हणजे डबल गॅरंटी असे ते म्हणाले. पाच मिनिटे तुमची तर पाच वर्षे आमची हा आमचा शब्द आहे. काम करणाऱ्या लोकांना मत द्यायचे असून घरी बसणाऱ्यांना कायमचे घरी बसवायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी मतदारांना केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages