मुंबई - एलिफंटा येथे जाणारी नीलकमल ही बोट आज सायंकाळी गेटवे ऑफ इंडियाच्या समुद्रात बुडाली. या बोटीवर 114 जण होते. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 नौदलाचे जवान आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या पैकी 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल. या घटनेची नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (18 डिसेंबर रोजी) सायंकाळी 5.15 वाजता नीलकमल ही खासगी बोट एलिफंटाकडे जाताना उरण कारंजा येथे बुडाली. या बोटीमध्ये 114 प्रवासी आणि कर्मचारी होते. बोट बुडाल्याची माहिती मिळताच कोस्टगार्ड आणि इतर यंत्रणांनी बचाव कार्य सुरू केले. पाण्यात बुडालेल्या प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढून जे एन पी टी, नेव्ही डॉकयार्ड, अश्विनी, सेंट जॉर्ज, कारंजे, एन डी के हॉस्पिटल मोरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जे एन पी टी रुग्णालयात 57 जणांना दाखल करण्यात आले त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर असून एकाचा मृत्यू झाला आहे. नेव्ही डॉकयार्ड हॉस्पिटलमध्ये 25 जणांना दाखल करण्यात आले. त्यापैकी 23 जणांची प्रकृती स्थिर असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अश्विनी रुग्णालयात एकाला दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. सेंटजॉर्ज रुग्णालयात 9 जण दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. कारंजे येथे 12 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर मोरा येथील एन डी के रुग्णालयात दाखल केलेल्या 10 जणांचा मृत्यू झाला आहे. बोटीवर काम करणारे 5 कर्माचारीही सुरक्षित असल्याची माहिती बचाव पथकाने दिली.
बचावकार्यासाठी सर्व यंत्रणा तैनात करा - मुख्यमंत्री
एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले. नौदल, कोस्टगार्ड, पोर्ट, पोलिस पथकच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचविण्यात आले आहे. तथापि अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.
बोट दुर्घटनेच्या बचावकार्याला वेग द्या - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबईत एलिफंटा परिसरात आज सायंकाळी प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली असून त्याबाबतच्या बचावकार्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढा, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यंत्रणेला सांगितले.
एलिफंटाला जाणाऱ्या फेरीबोटीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बचावकार्याची माहिती घेतली. त्याचबरोबर पोलिस उपआयुक्त (बंदरे) सुधाकर पाठारे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधत माहिती घेतली.
No comments:
Post a Comment